मुंबई : मुंबई महापालिकेतील पाच स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेनेकडून अरविंद भोसले आणि तृष्णा विश्वासराव यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.

भाजपकडून गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांच्या नावाची आधीच घोषणा करण्यात आली होती, तर काँग्रेसकडून सुनील नरसाळे यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली.

या पाच जणांपैकी आज चर्चेत राहिले ते शिवसेनेचे अरविंद भोसले. नगरसेवक होण्यापूर्वी त्यांनी आगळे-वेगळे संकल्प केले आहेत. पुष्पगुच्छाऐवजी रोपटं स्वीकारुन बाळासाहेबांच्या नावानं वृक्षारोपण करण्याचा संकल्प भोसलेंनी केला.

अरविंद भोसले शिव आरोग्य उपक्रमा अंतर्गत अवयवदान करणार आहेत. महापौराना पत्र देऊन महापालिकेच्या रुग्णालयात मरणोत्तर अवयव दान करण्याचा निर्णय भोसलेंनी घेतला आहे.

दिग्गजांना मागे सारुन मुंबई महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी..


मुंबई महापालिकेत भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदी गणेश खणकर आणि श्रीनिवास त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. अनेक दिग्गजांना मागे सारुन स्वीकृत नगरसेवकपदी खणकर आणि त्रिपाठी यांची वर्णी लागली.

भाजपकडून पालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या अनेकांची नावं स्वीकृत सदस्याच्या रेसमध्ये होती. यामध्ये भाजप नेते आशिष शेलार यांचे भाऊ विनोद शेलार, प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर, रितू तावडे यांसह अनेक दिग्गजांचा समावेश होता. पण, या सर्वांना बाजुला सारुन भाजपनं अगदीच अनपेक्षित नियुक्त्या केल्या.

स्वीकृत नगरसेवक झालेल्या गणेश खणकर यांना पालिका निवडणुकीत तिकीट नाकारुन ते प्रकाश दरेकरांना देण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांना स्वीकृत नगरसेवकपद देऊन न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर त्रिपाठींच्या रुपानं उत्तर भारतीय चेहऱ्याला समाविष्ट करण्यात आलं.

संबंधित बातम्या :


शिवसेनेची माघार, मनसेचे दिलीप लांडे बिनविरोध


मुंबईतील 17 पैकी 8 प्रभाग समित्यांचा निकाल हाती, कुठे कोण विजयी?


मुंबईत प्रभाग समितीच्या निवडीसाठी शिवसेना-मनसे युती