Arrest Warrant Against Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढल्या आहेत. संजय राऊत यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलं आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीनंतर हे वॉरंट जारी करण्यात आलं आहे. मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.


संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यावेळी राऊत यांनी मेधा सोमय्या यांचाही उल्लेख केला होता. याच आरोपांप्रकरणी सोमय्या कोर्टात गेल्याची माहिती समोर आली होती. संजय राऊत यांनी आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले अशी तक्रार करत मेधा सोमय्या यांनी शिवडी न्यायालयात केली होती. त्यानंतर कोर्टाने संजय राऊत यांना समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र संजय राऊत हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात आता अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.



 


 


गेल्या महिन्यात शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांच्याविरुद्ध समन्स जारी करुन त्यांना 4 जुलै रोजी हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र, सोमवारी कोर्टात राऊत किंवा त्यांचे वकील हजर नव्हते, असे मेधा सोमय्या यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही संजय राऊत यांच्याविरुद्धी जामीनपात्र वॉरंट जारी करण्यासाठी अर्ज केला होता, ज्याला न्यायालयाने परवानगी दिली आहे," गुप्ता पुढे म्हणाले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाला स्थगिती देत ​​18 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.


समन्समध्ये काय म्हटलं होतं?
महानगर दंडाधिकारी न्यायालयाने समन्स जारी करताना असं म्हटलं होतं की, आरोपीने (संजय राऊत) तक्रारादार (मेधा) यांच्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्ये केली आहेत, जी मोठ्या प्रमाणावर लोकांना दिसेल आणि वर्तमानपत्रात लोक वाचतील. हे रेकॉर्डवर आलेल्या कागदपत्रे आणि व्हिडीओ क्लिपमधून प्रथमदर्शनी उघडकीस आलं आहे. आरोपी संजय राऊत यांनी जे शब्द उच्चारले त्यामुळे तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचली, हे तक्रारदाराने प्रथमदर्शनी सिद्ध केलं आहे, असं न्यायालयाने म्हटलं होतं.


मेधा सोमय्या यांची तक्रार काय?
मेधा सोमय्या यांनी विवेकानंद गुप्ता आणि लक्ष्मण कनाल या वकिलांच्या मार्फत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं होतं की, संजय राऊत यांनी केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक आहेत. मी आणि माझे पती हे मीरा भाईंदर महापालिकेच्या अखत्यारित येणाऱ्या काही सार्वजनिक शौचालयांच्या बांधकाम आणि देखभालीच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 499 आणि 500 ​​अंतर्गत संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीच्या आरोपाखाली त्यांच्याविरुद्ध कार्यवाही सुरु करावी.