CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज समृद्धी महामार्ग गेम चेंजर असल्याचं म्हटलं आहे. या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिलं आहे. ही फडणवीसांची योजना होती. त्यांनी मला जबाबदारी दिली, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय . या महामार्गामुळं लोकांची समृद्धी होईल, शेतकरी आत्महत्या करणार नाही, असंही शिंदे यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील 'संकल्प से सिद्धी' परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. या कार्यक्रमात शिंदे बोलत होते. या परिषदेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.
तर आपण मुंबई ते पुणे 20-25 मिनिटं आधी आपण पोहोचू
मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, शपथविधी होताच आम्ही काम सुरु केलं. केंद्रीय अर्थमंत्र्यांसोबत बैठक झाली, इन्डस्ट्रीअल काॅरिडोर संबंधात चर्चा झाली. हे सरकार बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचं सरकार आहे, मोदींनी आशीर्वाद दिलाय, गृहमंत्री शाह, नितीन गडकरी तर आपलेच आहेत. यात फडणवीसांचे मोठे योगदान आहे. आमची चांगली दोस्ती आहे. गडकरींची ओळख आपल्याला माहिती आहे, देशातला पहिला सुपर एक्सप्रेस त्यांनी बनवला. एक्सप्रेस-वे मुळे आपण मुंबई-पुणे अडीच तासांवर आणलं. या मार्गावर आता मी एक टनेल बनवत आहे, लवकरच तो पूर्ण होईल, 20-25 मिनिटं आधी आपण पोहोचू, असंही शिंदे म्हणाले.
व्हॅट कमी करण्याचा प्रयत्न करु
मुख्यमंत्री म्हणाले की, गडकरींचे देखील राज्यावर लक्ष आहे, आता निधी जास्त द्यावा लागेल. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. सामान्य माणसाच्या अपेक्षा वाढल्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की, शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करणार आहे. राज्यासाठी जेवढे करायचं करु. आमच्यासोबत केंद्राचा आशीर्वाद आहे, असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की, महागाई खूप वाढत आहे, इथेनाॅलमुळे खर्च कमी होईल. व्हॅट कमी करण्याचा प्रयत्न करु. शेंद्रा-बिडकीन तयार झालंय, ३ लाख रोजगार मिळणार, पंतप्रधानांनी प्रकल्प देशाला समर्पित केलाय असं त्यांनी सांगितलं.