मुंबई : ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याचा फ्लॅटवरील मालकी अधिकार शाबूत ठेवत सेशन्स कोर्टाने त्यांचा मुलगा आणि सूनेला घर सोडून जाण्यास फर्मावलं आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टाने डिसेंबर 2017 मध्ये दिलेले अंतरिम आदेश गेल्या आठवड्यात सेशन्स कोर्टाने कायम ठेवले. इतकंच नाही, तर सेशन्स कोर्टाने सून सोनाली सावंत यांना तीन महिन्यांचं भाडं म्हणून 30 हजार रुपये सासू-सासऱ्यांना देण्याचे आदेश दिले.
37 वर्षीय सोनाली सावंत यांनी दाखल केलेली याचिका सेशन्स कोर्टाने फेटाळून लावली. 'वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणं ही याचिकाकर्त्या आणि त्यांच्या पतीची जबाबदारी आहे. मात्र त्यांना या वयात कोर्टाच्या प्रक्रियांना सामोरं जावं लागत आहे.' अशा शब्दात कोर्टाने सोनाली यांना फटकारलं. मालती आणि श्रीधर सावंत यांना 5 हजार रुपये देण्याचे आदेशही कोर्टाने दिले.
मालती आणि श्रीधर सावंत यांनी गेल्या वर्षी माझगाव महानगरीय मॅजिस्ट्रेट कोर्टात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मुलगा आणि त्याच्या पत्नीला घरात शिरण्यास मज्जाव करण्याची मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने मुलगा-सुनेला घरात शिरण्यास प्रतिबंध करणारे आदेश बजावले होते. मुंबईतील परेल भागात सावंत दाम्पत्याच्या नावे फ्लॅट आहे.
आपल्या अनुपस्थितीत मॅजिस्ट्रेट कोर्टाने आदेश दिल्याचं सांगत सोनाली यांनी निर्णयाला सेशन्स कोर्टात आव्हान दिलं. पतीची नवीन नोकरी आणि मुलीच्या शाळेचं कारण देत त्यांनी आदेशाचं तात्काळ पालन शक्य नसल्याचं डिसेंबर महिन्यात कोर्टात सांगितलं होतं. मात्र पुन्हा एप्रिल महिन्यात सोनाली यांनी मुलीच्या निकालाचं कारण पुढे केल्याने कोर्टाने संताप व्यक्त केला.
मुलगा-सुनेने घर सोडावं, पालकांना 30 हजार द्यावेत, सेशन्स कोर्टाचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Apr 2018 06:28 PM (IST)
मालती आणि श्रीधर सावंत यांनी गेल्या वर्षी माझगाव महानगरीय मॅजिस्ट्रेट कोर्टात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती.
प्रातिनिधीक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -