मनसेने नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2018 04:01 PM (IST)
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं.
मुंबई : राज्यात आणि कोकणात नाणार रिफायनरी प्रकल्प होणार नाही, हे स्पष्ट केल्यानंतर मनसेचे कार्यकर्ते या प्रकल्पाविरोधात आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसे कामगार सेनेने मुंबईतील ताडदेव येथील नाणार प्रकल्पासाठी काम करणारं कार्यालय फोडलं. ताडदेव येथील रिफायनरी अँड पेट्रो-केमिकल लिमिटेडवर मनसैनिकांनी हल्ला चढवला. नाणारचा प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दात ठणकावून सांगितलं. रिफायनरी प्रकल्प न होऊ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच नाणारवासियांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती. मुंबईतील मुलुंडमध्ये मनसेच्या वतीने 100 महिलांना रोजगाराचं साधन म्हणून रिक्षांचं वाटप करण्यात आलं. यावेळी झालेल्या सभेत राज ठाकरेंनी हा इशारा दिला होता. ''नाणार प्रकल्प कोकणात होणार नाही म्हणजे नाही. हा प्रकल्प महाराष्ट्रात झाला नाही, तर गुजरातला जाईल,'' अशी भीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखवतात. मात्र, गुजरातच का, असा सवाल करत प्रकल्प कुठेही न्या, पण तो कोकणात होणार नाही, राज्य सरकारला काय करायचं ते करावं, असं राज ठाकरे म्हणाले होते. संबंधित बातमी :