मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला असून आज (18 मार्च) दिवसभरात तब्बल 2877 रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आतापर्यंतची ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मागील वर्षीच्या 7 ऑक्टोबरला ही संख्या 2848 होती. त्यानंतर कोरोना उतरणीला आला. मात्र आज रुग्णसंख्येने रेकॉर्डब्रेक केल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यांत कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. एप्रिल मे, जूननंतर कोरोनाने कहर केला होता. त्यानंतर 7 ऑक्टोबरला ही रुग्णसंख्या 2848 पर्यंत पोहोचली. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या होती. मात्र त्यानंतर महापालिकेच्या प्रभावी उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणीमुळे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. त्यामुळे अनलॉक प्रक्रिया टप्प्याटप्प्याने शिथील केल्याने सार्वजनिक ठिकाणी असलेले व्यवहार पुन्हा सुरु झाले. मात्र कोरोनाचा धोका कमी कायम असल्याने कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र वाढलेली गर्दी आणि लोकांनी कोरोना नियमाचे पालन न केल्याने ही संख्या पुन्हा वाढली आहे.
फेब्रुवारीच्या मध्यानंतर दिवसेंदिवस आकडेवारी वाढते आहे. बुधवारी (17 मार्च) 2377 रुग्णांची नोंद झाली होती. आज दुसऱ्याच दिवशी ही संख्या तब्बल 500 रुग्णांनी वाढून 2877 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक असल्याची नोंद झाली आहे. दिवसभरात 1193 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 लाख 52 हजार 835 रुग्ण आढळले असून 3 लाख 21 हजार 947 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 11 हजार 555 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 18 हजार 424 सक्रीय रुग्ण असून विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत.
राज्यात आज 25 हजार 833 नव्या रुग्णांची नोंद
आज राज्यात तब्बल 25,833 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. चिंताजनक बाब म्हणजे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना संसर्ग वेगाने पसरत आहे. यात पुणे, नाशिक, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नांदेडचा समावेश आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन लावूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात लॉकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.