Mumbai Rains Update : मुंबईत (Mumbai) सध्या जोरदार पावसाची (Rain) बॅटिंग सुरु आहे. मुंबईसह ठाणे, कल्याण या भागांमध्ये मागील 24 तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. सांताक्रूझ वेधशाळेने मुंबईसह उपनगरात 204 मिमी पाऊस बरसला असल्याची नोंद केली आहे. या वर्षातील ही सर्वाधिक पावसाची नोंद आहे. तर मागील नऊ वर्षात तिसऱ्यांदा जुलै महिन्यात चोवीस तासांमध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. 


याआधी मुंबईसह उपनगरात बरसलेल्या पावसाची नोंद


या आधी मुंबईसह उपनगरांमध्ये दोन वेळा जुलै महिन्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पहिल्यांदा 2 जुलै 2019 रोजी 375.2 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर 16 जुलै 2021 रोजी 4 तासांत 253.3 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तसेच मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणांतील पाणीसाठा 42.75 टक्क्यांवरुन 47.5 टक्क्यांपर्यंत वाढला असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


ठाणे, नवी मुंबईत इतका पाऊस


गेल्या चोवीस तासांमध्ये ठाण्यात 113.8 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर कल्याण 122.3 मिमी, पालघर 93 मिमी आणि अंबरनाथ 109.7 मिमी इतक्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईतील कोपरखैरणे येथे 140.2 मिमी,ऐरोली 108.2 मिमी इतका पाऊस बरसला आहे. 


पालघरला ऑरेंज अलर्ट तर मुंबईला यलो अलर्ट


भारतीय हवामान विभागाच्या ठाणे वेधशाळेने मुंबईसह पालघरला अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईला हवामान विभागने यलो अलर्ट तर पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान या भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. 


पालघरमध्ये सतर्क राहण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 


शनिवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर वसईमध्ये सखल भागामध्ये पाणी साचले होते. तर जलसाठा कायम होता. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी देखील अडचण निर्माण झाली होती. तर इर्शाळवाडीमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर पालघरमध्येही दरडप्रवण क्षेत्रात प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तसेच दरड प्रवण क्षेत्राचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. 


ठाण्यात शनिवारी दुपारी मुसळधार पावसामुळे घोडबंदर रोड येथील निवासी वसाहतीला लागून असलेल्या टेकडीवर दरड कोसळल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच पावसामुळे रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे शनिवारी नाशिक महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. तर शनिवारी मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. 


हे ही वाचा : 


Maharashtra Rain : मुसळधार पावसामुळं राज्यातील काही भागात पूरस्थिती, तर कुठं जनजीवन विस्कळीत; आजही मुसळधार पावसाचा इशारा