Mumbai Local News Updates : मुंबई : मुंबईसह (Mumbai News) मुंबई उपनगरांत मुसळधार पावसानं (Heavy Rain) हजेरी लावली आहे. मुंबईसह उपनगरात पावसाचा (Mumbai Rains) जोर वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच मुसळधार पावसाचा फटका मुंबईची (Mumbai Local) लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलला बसला आहे. सकाळच्या सत्रातील पडणाऱ्या पावसाचा फटका मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला झाला आहे. तसेच, पावसामुळे हार्बल रेल्वेसेवाही उशिरानं धावत असल्याची माहिती मिळत आहे.


मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन प्रशासनाकडून चाकरमान्यांना करण्यात येत आहे. सकाळची वेळ असल्यामुळे अनेकांनी ऑफिस गाठण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दी केली आहे. परंतु, मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेल्या रेल्वेसेवेचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वे , पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं  तर हर्बर लाईनवरील लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं धावत आहेत. 


सकाळपासूनच पावसाची संततधार पाहायला मिळतेय. पावसामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. त्यासोबतच ठाण्यात मुलुंड टोल नाक्यावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंलुंड टोलनाक्यावर 2 ते 3 किलोमीटर लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. दरम्यान, सकाळी कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या नोकरवर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.