वसई : राज्यात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या घटना वाढत असताना पोलीस यंत्रणेकडून धनिकांच्या मुलांना कसं वाचवलं जातं, याचा प्रत्यय पुन्हा वसईत (Vasai Accident) आला आहे.  ज्या इनोव्हा क्रिस्टा कारने  घरात धडक देत निष्पाप कुत्र्याचा (Dog died in Accident) बळी घेतला त्या प्रकरणात वसई पोलीस आरोपी प्रतीक दवे याला वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब समोर आली आहे. प्रतीक दवे (Pratik Dave) हा धनिकपुत्र असल्याने या प्रकरणात कायदेशीर पळवाटा राहतील, अशी व्यवस्था जाणीवपूर्वक केली जात असल्याची कुजबुज सुरु आहे. 


प्राथमिक माहितीनुसार, न्यायालयात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या एफआरआयमध्ये  पोलिसांनी गाडीचा नंबरचं चुकीचा टाकल्याच आढळून आलं आहे. एफआरआय मध्ये गाडीचा नंबर एम.एच.-१४ डी.आय. ८१४५  असा नमूद करण्यात आला आहे. मात्र, ज्या कारने अपघात केला आहे त्या कारचा नंबर एम.एच.-१४ जी.ए. ७१२७ असा आहे. ही कार  पोलीसांनी  ताब्यात घेतलेली आहे. पोलीस ठाण्यातच ती कार आहे. 
एवढी मोठी चुक अनावधानाने झाली का जाणीवपूर्वक झाली, याबाबत तपास करण्याची मागणी नागरिक करत आहेत.


नेमकं काय झालं?


वसईत एका धनाढ्य बापाच्या मुलाची  भरधाव गाडी एका घरात घुसली आणि एका निष्पाप मुक्या जनावराचा त्यात जीव गेला होता.  घटना गुरुवारी रात्रीची होती.  यात धनाढ्य बापाच्या मुलगा हा कार चालवत नव्हता. तर तो गाडीत बसल्याचे पोलिसांनी सांगितलयं. ड्रायव्हर हा दुसरा होता. घटनेच्यावेळी धनाढ्य बापाच्या मुलगा ज्याची कार आहे तो प्रतीक दवे, तर ज्याने दुर्घटना केली त्या कार चालकाचं नाव कैवल्य जयकर असं आहे. कैवल्य जयकर, अनिस जयकर आणि प्रतीक दवे हे तिघे इनोव्हा कारने वसई तहसील समोरून वसई स्टेशनच्या दिशेने जात होते. सिद्धार्थनगर परिसरात कार चालकांचे नियंत्रण सुटल्याने त्याने ती कार रस्त्यावरील दुभाजक ओलांडून गणेश जाधव यांच्या घराच्या सुरक्षा भिंतीला जाऊन आदळली होती.


या दुर्घटनेत एक मोटार सायकल, कॅन्टिनचे टेबल, खुर्च्यांचं नुकसान झालं. झोपलेल्या अवस्थेत असलेल्या एका कुत्र्यालाही कारने चिरडलं आहे. यात त्या कुत्रीचा जागीच मृत्यू झाला आहे. याबाबत वसई पोलिसांकडून अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, आता प्रतीक दवे याला वाचवण्यासाठी पोलिसांकडूनच एफआयरमध्ये जाणीवपूर्वक चुकीची माहिती किंवा पळवाटा राहतील, अशी तजवीज करण्यात आली आहे का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून विचारला जात आहे.


आणखी वाचा


वरळी अपघातातील मिहीर शाहाला व्हीआयपी वागणूक, कोर्टात आणण्यासाठी खासगी कार; पोलीस एवढी मेहरबान का?