मुंबई : मुंबई आणि उपनगरांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरु झालेल्या जोरदार पावसामुळे राज्य सरकारने मंगळवारी म्हणजे 2 जुलै रोजी रोजी  शाळांना सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हॅण्डलवरुन हे ट्वीट करण्यात आले आहे.




मुंबई, ठाणे, नवी मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळांना सुट्टीची घोषणा करण्यात आलेली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने जाहीर केलं आहे.


मुंबई शहरात आणि उपनगरात देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहनही राज्य सरकारने केलं आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहील असंही सरकारने जाहीर केलं आहे.

रेल्वे वाहतूक विस्कळीत 

रेल्वेच्या तिन्ही  मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेवर विविध ठिकाणी ट्रॅकवर पाणी साचल्याने ठाणे ते मुंबई रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. रेल्वेची वाहतूक मध्य रेल्वेवर सीएसएमटी-अंधेरी-गोरेगाव, ठाणे-कसारा, ठाणे-कर्जत-कसारा, हार्बर रेल्वेवर वाशी-पनवेल, ट्रान्स हार्बर रेल्वेवर ठाणे-वाशी-पनवेल सुरळीत सुरु आहे.

ठाणे-सीएसएमटी, वाशी-सीएसएमटी रेल्वे वाहतूक पुर्णपणे ठप्प आहे. तर ट्रान्स हार्बरवरील वाहतूक उशीराने सुरु आहे. पश्चिम रेल्वेची सेवा चर्चगेट ते वसई दरम्यान सुरळीत आहे. मात्र नालासोपारा दरम्यान पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर एसी रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.