मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. शनिवारी पहाटेपासूनही मुंबईत मुसळधार पावसाच्या सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार येत्या काही तासांमध्ये मुंबईत आणखी मुसळधार (Mumbai Rain) पाऊस होण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम मुंबईतील रेल्वे (Mumbai Local Train) आणि रस्ते वाहतुकीवर होण्याची दाट शक्यता आहे. 


आज पहाटेपासून मुंबई शहर, उपनगर, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे प्रथेप्रमाणे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईत सध्या आकाशात काळ्या ढगांची गर्दी दिसत आहे. त्यामुळे पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, पहाटेपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील सखल भागांमध्ये आतापासूनच पाणी साचले आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर होण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबई महानगरपालिकेने पाणी उपसण्यासाठी पंप लावल्याने पाण्याचा निचरा झाल्यास कोणतीही समस्या उद्भवणार नाही. परंतु, पुढील काही तास पावसाचा जोर कायम राहिल्यास पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची  शक्यता आहे. वसई, विरार, नालासोपाऱ्यात सकाळपासून  पावसाची रिपरिप  सुरू आहे. हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलार्ट दिला आहे. दोन दिवसांपासून नसई विरार मध्ये  संततधार पावसासह अधूनमधून जोरदार पाऊस पडत आहे. सध्या वसई विरार शहरात कुठेही पाणी साचले नाही. 


मुंबईची लाईफलाईन विस्कळीत


पहाटेपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या सेवेवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशीराने धावत आहेत. तर हार्बर रेल्वे मार्गावरील ट्रेन 10 ते 15 मिनिटांच्या विलंबाने धावत आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या चाकरमन्यांना मनस्ताप सहन करावा लागू शकतो.


कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये मुसळधार पाऊस


कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये शुक्रवारी पावसाची रिपरिप सुरु होती. मात्र, काल रात्रीपासून या भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली, उल्हासनगरमध्ये रस्ते वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे. 


रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट


रायगड जिल्हयात सकाळपासून हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळताना दिसत आहेत, मात्र आज आणि उद्या रायगड जिल्हयाला ऑरेंज अलर्ट जाहिर कऱण्यात आलेला त्यामुळे जिल्हयात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे . रायगड जिल्ह्याला आज आणि उद्या सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे,रोहा येथील कुंडलिका नदी ही काल झालेल्या पावसामुळे दुथडी भरुन वाहताना दिसत आहे. त्यामुळे रोहा शहरांतील नागरीकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे , किनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर होण्याच्या सूचना रोहा नगरपरिषदेने केल्या आहेत.


आणखी वाचा


Live Updates : मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली, वाहतूक बंद करण्याचा निर्णय!


आज राज्यात पडणार मुसळधार पाऊस, 2 जिल्ह्यांना रेड अलर्ट तर 9 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट, वाचा हवामान विभागाचा अंदाज