Maharashtra Rain News : हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा अंदाज.


दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा रेड अलर्ट जारी


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील दोन जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रत्नागिरी आणि  विदर्भातील गडचिरोली या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. या दोन्ही जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं या दोन जिल्ह्यातील नागरिकांनी योग्य ती खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यातील नऊ जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, वर्धा, नागपूर आणि अमरावती या जिल्ह्यांचा समावेश आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 


अनेक ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी


दरम्यान, महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. संपूर्ण मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईसह पालघर जिल्ह्यातही पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पुणे आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाची जोरदार हजेरी, काही भागात घरात शिरलं पाणी


भंडारा जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली. विजांचा कडकडाटासह जिल्ह्यात कुठं हलक्या, कुठं मध्यम तर कुठं जोरदार सरी बसल्यात. पहाटेच्या सुमारास या पावसानं चांगलाच जोर पकडला. या पावसानं जिल्ह्यातील नदी - नाले प्रवाहित झाले आहेत. तर, काही सखल भागातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं नागरिकांची रात्री चांगलीच तारांबळ उडाली. मुसळधार पावसामुळं ग्रामीण भागातील अनेकांच्या घरातील अन्नधान्यासह जीवनोपयोगी साहित्यांची चांगलीच नासाडी झाली आहे. आजही या भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.


महत्वाच्या बातम्या:


Heavy Rain : मुसळधार पावसामुळे दाणादाण! वर्ध्यात सकाळपासून अतिवृष्टी; अनेक गावांना फटका, नदी, नाल्यांना पूर