Mumbai Rain Update : राज्यातील (Maharashtra Rain Update) अनेक भागात पावसाने आगमन केलं आहे. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज पूर्ण भरून वाहू लागला आहे. हाच तलाव गेल्या वर्षी दिनांक 5 जुलै रोजी पूर्ण भरुन वाहू लागला होता. ही बाब लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव सुमारे 24 दिवस आधी भरून वाहू लागला आहे. 545 कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
Maharashtra Rains : राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी, मुंबईसह कोकणात येत्या 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा
पवई तलावाबाबत महत्त्वाची माहिती
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन 1890 मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.
उद्याचा मुंबई आणि ठाण्याचा रेड अलर्ट ऑरेंज अलर्टमध्ये बदलवला आहे. रायगड आणि रत्नागिरीसाठी उद्या आणि परवा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग, पालघर उद्या आणि परवा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे तर पुणे, कोल्हापूर आणि साताऱ्यासाठी ऑरेंज अलर्ट क़ायम ठेवण्यात आला आहे.