मुंबई : मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे एस बॅन्ड डॉप्लर वेदर रडार (Doppler Radar) सुरु झाले आहे. सर्वसामान्य आणि हवामान अभ्यासकांसाठी संकेतस्थळावर हे हवामान विभागाकडून उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राचे प्रमुख आणि उपमहासंचालक डॉ. जयंत सरकार यांनी ही माहिती दिली. एबीपी माझाने जुने डॉप्लर रडार ऐन पावसाळयात देखील बंद असल्याची बातमी दाखवल्यानंतर दोनच दिवसात रडार कार्यान्वित करण्यात आले आहे.
ऐन तौक्ते चक्रीवादळ मुंबईजवळून जात असताना हे रडार बंद पडले होते. यासंबंधीची बातमी सर्वप्रथम एबीपी माझाने दिल्यानंतर मुंबईकरांसाठी एक सी-बॅन्ड रडार आणि 4 छोटे एक्स बॅन्ड रडार हवामान विभागाकडून देण्यात आले होते. मात्र, जुने एस बॅन्ड रडारचे ऐन पावसाळ्यात देखील अभियंत्यांकडून काम सुरु होते. अशातच हवामान विभागाकडूनच अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, तौक्ते चक्रीवादळातून धडा न घेता एस बॅन्डचे रडार नादुरुस्तच होते.
कुलाबास्थित एस बॅन्ड डॉप्लर रडारची क्षमता 500 किमीपर्यंत पर्यंतची आहे. ज्यात पालघर ते रत्नागिरी आणि महाराष्ट्रात थेट मराठवाड्यातील पावसाचा अंदाज बांधण्याची क्षमता ह्या रडारमध्ये आहे. या रडारच्या माध्यमातून मुसळधार पाऊस कुठे, किती आणि कसा पडत आहे? ढगांची दिशा, त्याचसोबत ढगांमध्ये पाणी आहे की बाष्प याचा अंदाज अचूक वर्तवण्यात मदत मिळत असते.
डॉपलर रडार (Doppler Radar) पावसाची खात्रीशीर माहिती देणारी आपत्कालीन यंत्रणा आहे. डॉपलर रडार पाऊस, ढगफुटी, गारपिटीची माहिती 4 ते 6 तास आधी देते असते. सोबतच साधारण रडारच्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार ते आपल्या परिघातील पावसाची तीव्रता कशी असेल आणि किती मीमी पाऊस प्रति तास कोसळू शकेल याचा अंदाज डॉपलर रडारच्या माध्यमातून अचूक मिळत असतो. मुंबईत मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असतो. अशातच मुंबईतील 26 जुलैच्या पावसानंतर डॉपलर रडार लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हवामान विभागाकडून (India Meteorological Department) मुंबईत एक लहान सी-बॅन्ड रडार देखील कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासंबंधी जोगेश्वरीत हे सी-बॅन्ड रडार लावण्यात आले असून याच्या ट्रायल रनला हवामान विभागाकडून सुरुवात करण्यात आली आहे. यासंबधीची माहिती देखीलआयएमडीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या सी-बॅन्ड रडारची क्षमता 350 किमीपर्यंत अंदाज बांधण्याची आहे. लवकरच आयएमडीकडून या नव्या सी बॅन्ड रडारला कार्यान्वित करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे हवामान विभागाचे महासंचालक मृत्युंजय मोहोपात्रा यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले होते.
संबंधित बातम्या :