मुंबई : राज्यातील (Maharashtra Rain Update) अनेक भागात पावसाने आगमन केलं आहे. ग्रामीण भागात पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावला असून पेरणीची लगबग सुरु झाली आहे. मुंबईसह उपनगर (Mumbai Rains) भागात देखील जोरदार पावसाची बॅटिंग सुरुच आहे. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणात अतितीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाची बॅटिंग, जोगेश्वरीत रस्ता जलमय
मुंबईसह उपनगरात पावसाची रिपरिप सुरुच असून मध्येच मुसळधार सरी बरसत आहेत. शिवाय, राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह पश्चिम उपनगरात रात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. पश्चिम उपनगरात अंधेरी, सांताक्रूझ, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली या सर्व परिसरामध्ये सध्या पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आह. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयाच्या समोर रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचलं आहे. रस्त्यावर पाणी साचल्यामुळे काही वाहन बंद पडत आहे तर काही वाहनांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नवी मुंबई, ठाणे, पनवेल भागात देखील काल रात्रीपासून पाऊस सुरु आहे.
येत्या 48 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा, आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट
येत्या 48 तासात मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत अतिमुसळधार पाऊस पडेल, अशी माहिती मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी दिली आहे. माहितीनुसार, "आज आणि उद्यासाठी मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण कोकणात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे आणि पश्चिमी वाऱ्यांनी जोर पकडला आहे त्यामुळे संपूर्ण कोकणात पाऊस असेल, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज, उद्या आणि परवासाठी रत्नागिरी आणि रायगडसाठी रेड अलर्ट आहे. त्यामुळे सर्वांनी खबरदारी घ्यावी, असं त्यांनी म्हटलं आहे.
मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पुढील 3- 4 तासात पावसाची शक्यता
मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि बीडमध्ये पुढील 3- 4 तासात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
तापी आणि पूर्णा नदीला पूर
मध्यप्रदेश आणि विदर्भातील काही भागात झालेल्या मुसळधार पावसाने जळगाव जिल्ह्यात तापी आणि पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळं हतनूर धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाल्याने आठ दरवाजे यंदाच्या मोसमात पहिल्यांदा उघडण्यात आले असून बावीस हजार चारशे क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धरण साठ्यात अचानक वाढ झाली तर त्याच्या बॅकवॉटरचा फटका लगतच्या गावांना बसण्याची शक्यता पाहता धरण टप्प्याटप्प्याने भरले जाते.
बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाची हजेरी
आज बीड जिल्ह्यामध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीची लगबग करतानाचे चित्र पाहायला मिळत आहे. माजलगाव परिसरामध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली तसेच बीड शहरामध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी असल्याचा चित्र पाहायला मिळालं.अंबाजोगाई शहर आणि परिसराला सुद्धा जोरदार पावसाने झोडपून काढले.
लातूर शहर आणि परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग
आज सकाळपासूनच लातूर शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.