Mumbai Rain : राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सध्या मुसळधार पाऊस (Mumbai Rain) सुरु आहे. मुंबईसह आसपासच्या परिसरात देखील जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं मुंबईच्या सखल भागात पाणी साचलं आहे. यामुळं वाहतुकीवर परिणाम होत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या अंदाजानुसार आजही मुंबईत पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई पालिकेची टीम सक्रिय
पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिकेची टीम सक्रीयपणे संपूर्ण महानगरात कार्यरत आहे. मलवाहिनी किंवा पर्जन्य जलनिःसारण वाहिनीवरील झाकण उघडल्याने नागरिकांना गंभीर अपघाताची शक्यता असते. त्यामुळे प्रवेशिकांचे झाकण (मॅनहोल) उघडू नये, असे आवाहन पालिकेनं केलं आहे. या बाबींचे उल्लंघन करणाऱ्यांवर सक्त कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत स्पष्ट करण्यात आलं आहे. उघडी झाकणे किंवा चोरीला गेलेल्या झाकणांबाबत तक्रार करण्यासाठी विभागीय पातळीवर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
पुढील तीन ते चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण आणि विदर्भात मुसळधार इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. उत्तर ओडिशा परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. अशात पुढील दोन दिवसात उत्तर मध्य प्रदेशाकडे सरकणार आहे. सोबतच पश्चिमी किनारपट्टी भागात देखील कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती झाली आहे. अशात मुंबईत अतिमुसळधारेचा इशारा दिलाय. सोबतच ठाणे आणि रायगड परिसरात देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावासाची शक्यता आहे.
मुंबईत तीन दिवसांत सहा जणांचा मृत्यू
मुंबईमध्ये मागील तीन दिवसांत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. गोवंडी, विले पार्ले आणि विद्याविहारमध्ये सहा जणांचं निधन झालं आहे. मुंबईमध्ये शनिवारपासून ठिकठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक भागात पावसामुळे पाणी साचले आहे. पावसामुळे इमारतीचा भाग खचल्याचं बोललं जात आहे. मुंबईतील पहिल्याच पावसात या दुर्घटनेमुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: