मुंबई: लोकल रेल्वेत प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या महिला टोळीला जेरबंद करण्यात आलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनल्स परिसरात गस्त घालत असताना पोलिसांना काही महिलांची हालचाल संशयास्पद असल्याचं आढळून आलं.

या महिलांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांची झाडाझडती घेतली. त्यावेळी या महिलांकडे असलेल्या बॅगेत तब्बल 25 महागडे मोबाईल फोन मिळून आलेत.

या सर्व मोबाईलची किंमत अंदाजे 2 लाख 94 हजार रुपये इतकी आहे. लोकलमध्ये हे फोन चोरल्याची कबुली अटकेत असलेल्या महिलांनी दिली.

मुंबई लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीचे प्रकार घडत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. त्यापैकी एक टोळी या निमित्ताने जेरबंद झाली आहे.

बसंती बाई रामरथ चौहान,सोनिया विजय मोगिया आणि राजाबाई सीताराम मोगिया सर्व राहणार मध्य प्रदेश अशी या टोळीतील मोबाईल चोरी करणाऱ्या महिलांची नावे आहेत. बुधवारी सकाळी साडे आठ वाजताच्या दरम्यान पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले.

लोहमार्ग पोलिसांचे पथक हे लोकमान्य टिळक टर्मिनल्स परीसरात गस्त घालत असताना काही महिलांची हालचाल संशयास्पद असल्याचे त्यांना आढळून आले. त्यांनी निर्भया पथकाच्या मदतीने या महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बॅग तपासली असता त्यात एकूण 25 महागडे मोबाईल आढळून आले, ज्याची किंमत अंदाजे 2 लाख 94 हजार 84 रुपये इतकी आहे.

पोलिसांनी या महिलांविरोधात गुन्हा नोंदवून, त्यांना अटक करुन न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.