Mumbai Train Accident: मध्य रेल्वेमार्गावर (Mumbai Train Accident) आज (सोमवारी 9 जून) सकाळी मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पुष्पक एक्स्प्रेस (Pushpak Express Train Accident) कसाऱ्याच्या दिशेने जात असताना 5 प्रवासी रेल्वेमधून खाली ट्रॅकवर पडले. ही घटना घडल्यानंतर या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, या पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या दिवा ते कोपर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडल्याची माहिती आहे. पुष्पक एक्स्प्रेस ट्रेनमध्ये प्रचंड गर्दी होते. त्यामुळे हे प्रवासी दारात लटकले होते. दिवा ते कोपर स्थानकांदरम्यान हे प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले, या घटनेचा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत, दरम्यान या अपघाताबाबत मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला यांनी एबीपी माझाला माहिती दिली आहे.
दिवा आणि मुंब्रा दोन्ही स्थानकांवरुन रुग्णवाहिकांची व्यवस्था
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील निला म्हणाले, आतापर्यंत माहिती मिळाली आहे त्यानुसार, सहा जण मुंब्रा स्थानकाजवळ ट्रेनमधून खाली पडले आहेत. रेल्वे गार्डने या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. दिवा आणि मुंब्रा दोन्ही स्थानकांवरुन रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. याची माहिती मध्य रेल्वेद्वारे देण्यात आलेली आहे.
पाच ते सहा प्रवासी दिवा ते मुंब्रा या रेल्वेस्थानकावरती एका ट्रेन मधून खाली पडलेले आहेत, ही माहिती कसाराला जाणाऱ्या रेल्वेच्या गार्डने सर्वात पहिल्यांदा दिली. त्यानंतर तिथल्या प्रवाशांच्या मदतीसाठी रुग्णवाहिका देखील मध्यरेल्वेकडून पाठवण्यात आलेले आहेत. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचलेले आहेत. सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्या प्रवाशांची चर्चा झाल्यानंतर ते प्रवासी कोणत्या गाडीतून खाली पडले आणि कोणत्या कारणामुळे ते रेल्वेतून खाली पडले याची अधिकृत माहिती त्यांच्याकडून मिळू शकते. आपल्या हाती असलेल्या माहितीनुसार त्यांच्यापर्यंत रुग्णवाहिका पोहचली आहे, त्यांना लवकरात लवकर उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. ही घटना साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे 9. 50 ते 9.55 च्या आसपास रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. या घटनेबद्दल आणखी काही तपशील मिळू शकलेला नाही. एकूण सहा प्रवासी ट्रेनमधून खाली पडल्याची माहिती आहे. या घटनेमध्ये जर आपापसातील वादविवाद किंवा अन्य कोणते कारण आहे याचा तपास सुरू आहे, घटनेमागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे.
अपघाताचे काही व्हिडीओ समोर
सदर अपघाताचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. या व्हिडीओत पुष्पक ट्रेनमधून खाली पडलेल्या प्रवाशी दिसत आहेत. या प्रवाशांना ट्रॅकवरुन उचलून प्लॅटफॉर्मवर आणण्यात आले. या प्रवाशांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचे कपडे फाटलेले दिसत आहेत. अनेकांना गंभीर दुखापत झाली असून यापैकी काही प्रवाशांना मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा गेल्या काही दिवासांतील मोठा अपघात असून रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या दुर्घटनेची नेमकी व्याप्ती अद्याप कळू शकलेली नाही.