Raj Thackeray & Uddhav Thackeray: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांशी हातमिळवणी करण्याचा निर्णय कधी घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं असताना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मात्र एकमेकांशी जोरदार शेकहँड केलंय. मुंबईतील एका लग्नसमारंभात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते समोरासमोर आले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे सुनील प्रभू आणि मनसेचे नेते नितीन सरदेसाईंनी हस्तांदोलन केलं. तसंच आता जोरदार हात मिळवूया असा संवाद देखील एकमेकांशी साधला. दुसरीकडे शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर फोटोसेशनसाठी एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाले. (Maharashtra Politics)

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) एकत्र येण्याबद्दलच्या चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरु आहेत. मुलाखती, भाषणं आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरेंनी एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सकारात्मक सूर आळवलाय. असं असलं तरी दोघांमध्ये थेट संवाद झालेला नाही. अशातच आता काही नातेवाईक ठाकरे बंधूंमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज ठाकरे या दोघांशीही जिव्हाळ्याचे संबंध ठेवून असणार अनेक नातेवाईक या दोन्ही भावंडांना पुन्हा एकदा एकत्र आणू शकतात असं जाणकारांचं म्हणणं आहे.

मराठी माणसासाठी फक्त उद्धव आणि राज यांनीच नव्हे तर आदित्य आणि अमित यांनी देखील एकत्र आलं पाहिजे, असं मत ठाकरे बंधूंचे चंदूमामा म्हणजेच चंद्रकांत वैद्य यांनी व्यक्त केलं. तसंच ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचं त्यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे अशक्य गोष्टी शक्य करण्यात हातखंडा आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊतांचं देखील कौतुक केलंय.

MNS & Shivsena: दोन्ही भावांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ; चंदूमामा काय म्हणाले?

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे – दोघे माझे भाचे. चर्चा सकारात्मक दिसत आहे. मी कित्येक वर्षे दोघांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. याला ईश्वर नक्की प्रतिसाद देईल. सध्याची चर्चा सकारात्मक दिशेने जाताना दिसत आहे. ईश्वर कधीच प्रयत्न वाया जाऊ देत नाही – देर है पर अंधेर नहीं. कालाय तस्मै नम:! आता हीच योग्य वेळ आहे मराठी माणसासाठी दोघांनी एकत्र येण्याची. मी कधीही या विषयावर त्यांच्याबरोबर बोलत नाही. आम्ही यावर चर्चा करत नाही, आणि तेही काही सांगत नाहीत. पण मला खात्री आहे, त्यांच्या मनात याचा गांभीर्याने विचार होत आहे.

संजय राऊत यांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक आहे. ते प्रयत्न करत आहेत आणि अशक्य गोष्टी शक्य करण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे मला अधिक आशा वाटते. अमित ठाकरे ,आदित्य ठाकरे दोघेही तरुण आहेत, त्यांचे विचार सकारात्मक आहेत. मुंबईत सध्या मराठी माणसावर अन्याय सुरू आहे. निवडणुकीसाठी नाही, पण मराठी माणसासाठी ते एकत्र येतील, असा मला विश्वास आहे. उद्धव ठाकरेंच्या अलीकडील विधानांकडे मी सकारात्मक नजरेने पाहतो. मामा म्हणून माझ्यासाठी दोघेही भाचे सारखेच आहेत. त्यांच्यातील दुरावा मनाला क्लेश देणारा आहे. मनातून मला 100% ते एकत्र यावं असं वाटतं, पण वास्तवात निदान 80%,20% तरी होईल, अशी आशा आहे. मराठी माणसासाठी हे आशादायक पाऊल ठरेल, असा माझा दृढ विश्वास आहे, असे चंद्रकांत वैद्य यांनी म्हटले.

आणखी वाचा

कदाचित राज ठाकरे-उद्धव ठाकरे फोनवर बोलले असतील; संजय राऊतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण, पडद्यामागे गुप्त घडामोडी?