मुंबई : गिरगाव चौपाटी ही दक्षिण मुंबईतील गजबजलेली चौपाटी असून इथे दक्षिण आणि मध्य मुंबईतील अनेक लहान-मोठ्या सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन होतं. अनंत चतुर्दशीनिमित्त गणपती विसर्जनासाठी महापालिकेने सर्व तयारी केली आहे.
विसर्जनादरम्यान महापालिकेला विविध गणेश मंडळांबरोबर समन्वय साधावा लागतो. त्यांना मंडपाच्या परवानग्या देण्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंतच्या विसर्जनापर्यंत दिवसरात्र काम करावं लागतं. या 11 दिवसांपैकी फक्त शेवटच्या दिवशी महापालिकेच्या अधिकारी / कामगारांची संख्या सुमारे 9 हजार इतकी मोठी आहे.
गणेश विसर्जनासाठी येणारे वाहन भुसभुशीत रेतीमध्ये अडकू नये आणि मूर्तींचे विसर्जन सुरळीतपणे पार पडावे, यासाठी चौपाटीच्या किनाऱ्यावर 840 जाड लोखंडी फळ्या (स्टील प्लेटस्) ठेवण्यात येतात. यावर्षी विविध गणेश मंडळांच्या विनंतीनुसार अतिरिक्त लोखंडी फळ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
छोट्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी 50 जर्मन तराफ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. 607 जीव सुरक्षारक्षकांसह जर्मन तराफे, 81 बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जनापूर्वी भक्तांनी अर्पण केलेले हार, फुले इत्यादी निर्माल्य जमा करण्यासाठी 201 निर्माल्य कलशांची व्यवस्था करण्यात आली आहे. कलशामधील निर्माल्य त्वरित वाहून नेण्यासाठी कॉम्पॅक्टर, मिनी कॉम्पॅक्टर आणि डंपर अशी एकूण 192 वाहनं सर्व विसर्जनस्थळी ठेवण्यात आलेली आहेत.
महापालिकेच्या विविध खात्यातील कर्मचाऱ्यांमध्ये योग्य तो समन्वय साधण्यासाठी एका नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहे. इतर 58 निरीक्षण कक्ष आणि 48 निरीक्षण मनोरे तयार करण्यात आले आहेत. अन्य ठिकाणी 87 स्वागत कक्ष तयार ठेवण्यात आले आहेत. आरोग्य विभागाकडून 74 प्रथमोपचार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
'बेस्ट'द्वारे खांबांवर उंच जागी लावण्यासाठी सुमारे 1991 दिवे (फ्लड लॅन्टर्न) आणि 1306 शोधदीप (सर्च लाईट) ची व्यवस्था, नागरिकांच्या सोयीसाठी फिरत्या 118 शौचालयांची (मोबाईल टॉयलेट्स) व्यवस्थाही करण्यात आली आहे.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासह मनुष्यबळाची व्यवस्था तसंच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसह 60 सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोईंग वाहनं, क्रेन्स, जे. सी. बी. मशिन्स, बुलडोझर यासारखी यंत्रसामुग्रीही विसर्जनाच्या वेळेपर्यंत तैनात करण्यात आली आहे.
पालिकेने 32 कृत्रिम तलाव, 69 नैसर्गिक विसर्जनस्थळे या सेवा-सुविधांमुळे अनंत चतुर्दशीदिनीही कृत्रिम तलावांत जास्तीत-जास्त गणेश भक्त गणेश मूर्तींचे विसर्जन करतील, अशी आशाही मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी व्यक्त केली आहे.
नागरिकांनी गणेश मूर्तींचे विसर्जन करताना घ्यावयाची काळजी -
1. खोल पाण्यात जाण्याचा प्रयत्न करु नका.
2. भरती आणि ओहोटीच्या वेळांची माहिती समुद्रकिनाऱ्यांवर लावण्यात आली असून ती समजून घ्या.
3. गणेशमूर्ती विसर्जनासाठी शक्यतो महापालिकेमार्फत नेमण्यात आलेल्या प्रशिक्षित मनुष्यबळाची मदत घ्या.
4. अंधार असणाऱ्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनासाठी जाण्याचा प्रयत्न करु नका.
5. मोठ्या गणेशमूर्तींबरोबर प्रत्यक्ष विसर्जनासाठी समुद्रात जाणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांची संख्या मोजावी
6. महापालिकेने पोहण्यासाठी निषिद्ध केलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करु नका.
7. गणेशमूर्तींचे विसर्जन करताना शक्यतो तराफ्यांचा, प्रशिक्षित मनुष्यबळाचा वापर करा.
8. समुद्रात / तलावात कुणी बुडत असल्यास त्वरित त्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना / पोलिसांना / जीवरक्षकांना द्या.
9. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे श्वसनाचा त्रास जाणवत असल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या.
10. अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका.
खबरदारीच्या सूचना-
1. भाविकांनी आपल्या लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. त्यांना पाण्यात / विसर्जनस्थळी जाण्यापासून मज्जाव करावा.
2. गणेशभक्तांनी मूर्तींचे विसर्जन करताना पाण्यात गमबुट घालावेत.
3. महापालिकेने केलेल्या विसर्जनाच्या व्यवस्थेचा म्हणजे विनामूल्य तराफ्यांचा किंवा बोटींचा वापर करावा.
4. मद्यप्राशन करुन समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनस्थळी जाऊ नये. अशा व्यक्तींवर मत्स्यदंशावरील वैद्यकीय उपचारांची परिणामकता घटते.
एखाद्या भाविकास मत्स्यदंश झाल्यास -
1. समुद्रातून बाहेर आल्यावर आपणांस मत्स्यदंश झाल्याचं जाणवल्यास तात्काळ ती जागा स्वच्छ पाण्याने धुवावी अथवा उपलब्ध असल्यास त्यावर बर्फ लावावा.
2. माशांचा दंश झालेल्या ठिकाणाहून रक्तस्राव होत असल्यास जखम झालेली जागा स्वच्छ कपड्याने किंवा हाताने दाबून धरावी, जेणेकरुन जास्त प्रमाणात रक्तस्राव होणार नाही.
3. मत्स्यदंश झालेल्या भाविकांनी घाबरुन न जाता महानगरपालिकेच्या समुद्रकिनाऱ्यावरील प्रथमोपचार केंद्रात जाऊन विनामूल्य वैद्यकीय सेवा प्राप्त करुन घ्यावी.
अनंत चतुर्दशी दिनी समुद्राला भरती आणि ओहोटी असून, या पार्श्वभूमीवर सर्वांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
भरती / ओहोटोची वेळ
5 सप्टेंबर 2017 सकाळी 11.36 वा. (भरती)
लाटांची उंची : 4.11 मी.
5 सप्टेंबर 2017 संध्याकाळी 5.37 वा. (ओहोटी)
लाटांची उंची : 1.4 मी.
5 सप्टेंबर 2017 रात्री 11.45 वा. (भरती)
लाटांची उंची : 3.86 मी.
6 सप्टेंबर 2017 पहाटे 5.26 वा. (ओहोटी)
लाटांची उंची : 0.81 मी