मुंबई : ‘जैन मुनीचा झाकीर नाईक होता कामा नये. आपल्याला त्यांची नाही तर त्यांना आपली दहशत वाटली पाहिजे.’ अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या नेत्यांना कानपिचक्या दिल्या.


मिरारोड- भाईंदर महापालिकेच्या निवडणुकीनंतर जैन मुनी आणि शिवसेनेमध्ये उद्भवलेल्या संघर्षाचे पडसाद, आज मातोश्रीवर झालेल्या संपर्कप्रमुखांच्या बैठकीतही पाहायला मिळाले. जैन मुनींना शिवसेनेची दहशत वाटली पाहिजे, तसंच जैन मुनींचा झाकीर नाईक होऊन देऊ नका. अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिवसेना नेत्यांना खडसवल्याचं समजतं आहे. मीरा रोड-भाईंदर महापालिकेमध्ये जैन मुनी न्याय पद्मसागर यांनी भाजपसाठी जोरदार प्रचार केला होता. जैनमुनींचा प्रचार नियमबाह्य असल्याची तक्रार करत शिवसेनेच्या संजय राऊतांनी त्यांची तुलना दहशतवाद्यांनी केली होती, त्यानंतर जैन समुदायानं देखील राज्यभर शिवसेनेविरोधात निदर्शनं केली होती.

‘मातोश्री’वरील शिवसेना संपर्कप्रमुख आणि नेत्यांच्या बैठकीत आज संघटनात्मक बांधणीवरून चांगलीच वादळी चर्चा झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नेमलेल्या संपर्कप्रमुख आणि संघटक एकमेकांना ओळखतच नसल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे या नेमणुका कुणी आणि कशा केल्या याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास कदम यांनी केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी नेत्यांना कानपिचक्याही दिल्या.

या बैठकीला शिवसेनेचे राज्यभरातील सर्व संपर्कप्रमुख आणि संपर्क नेते हजर होते. तसेच खासदार संजय राऊत, पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते, उद्योग मंत्री सुभाष देसाई, खासदार गजानन किर्तीकर इत्यादी वरिष्ठ नेतेही उपस्थित होते.

शिवसेनेच्या बैठकीत नेमकं काय-काय झालं?

- आज शिवसेना संपर्कप्रमुख आणि नेत्यांच्या बैठकीत संघटनात्मक बांधणीवरून चांगलीच वादळी चर्चा झाली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात नेमलेल्या संपर्कप्रमुख आणि संघटक एकमेकांना ओळखतच नसल्याचं उघडकीस आलं. त्यामुळे या नेमणुका कोणी व कशा केल्या याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी रामदास कदम यांनी केली.

- या नेमणुका नेत्यांना विश्वासात न घेता थेट सेनाभवनातून होत असल्याचं आरोप इतर नेत्यांनी केला. यामुळे नेते आणि सचिव यांच्यातला वाद उफाळून आला. तर, गटप्रमुखांच्या नोंदणीचे आदेश दिले असतांना त्याची परिणामकारक अंमलबजावणी शिवसेनेऐवजी भाजपकडून झाल्याची खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आणि याबाबत नेत्यांना कानपिचक्याही दिल्या.

- ‘जैन मुनीचा झाकीर नाईक होता कामा नये. आपल्याला त्यांची नाही तर त्यांना आपली दहशत वाटली पाहिजे. आज मांसाहारी खाऊ नका म्हणतात, उद्या कपडे घालू नका म्हणतील.’ अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी नेत्यांना सुनावलं.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरेंनी सेनेच्या सर्व संपर्कप्रमुखांना 'मातोश्री'वर बोलावलं!