Mumbai Police : मुंबई पोलिसांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. पोलिसांकडून अंमली पदार्थ तस्करांवर देखील विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात जवळपास पाच कोटी रूपयांचे ड्रग्स मुंबई पोलिसांनी जप्त केले आहे, अशी माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी दिली आहे.
आयुक्त संजय पांडे यांनी ट्विक करून एका आठवड्यात पोलिसांकडून करण्यात आलेल्या महत्वाच्या कामांची माहिती दिली आहे. संजय पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात 13 प्रकरणांमध्ये चार कोटी 82 लाख चार हजार 90 रूपये किंमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. तर गेल्या आठवड्यात गुटख्याची 24 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. यामध्ये 213089 किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे.
"हा माझा कामाचा अहवाल आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, नक्कीच अजून चांगले होऊ शकले असते. मी काही साप्ताहिक अपडेट्स शेअर करू शकलो नाही. कारण आम्ही शहरातील दैनंदिन समस्या हाताळण्यात व्यस्त आहोत. आम्ही निवडलेल्या प्राधान्यक्रमांमध्ये केलेल्या सर्वांचा अहवाल आम्ही देत ओहोत, असे संजय पांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
1 मार्च 20221 पासून शेवटच्या शुक्रवारपर्यंत चुकीच्या बाजूने वाहन चालवण्यासह इतर 66213 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. शिवाय विना हेल्मेटची 315344 प्रकरणे मुंबई पोलिसांकडे नोंद झाली आहेत. चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल 5987 आणि हेल्मेटविना वाहन चालवल्याबद्दल 16841 जणांचा परवाना रद्द करण्यासाठी आरटीओकडे पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर लवकरच कारवाई होईल,अशी माहिती संजय पांडे यांनी दिली आहे.
मुंबई पोलिसांकडे NoHonking ची 37261 प्रकरणे आजपर्यंत नोंदवण्यात आली आली असून आणखी कारवाई सुरू आहे. मुंबई पोलिसांचा सिटिझन फोरम ठामपणे आणि सक्रिय आहे. ट्रस्ट नोंदणी प्रक्रियेत असून लवकरच तो पूर्ण होईल. शिवाय मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी सल्लागार मंडळ देखील आहे, असे संजय पांडे यांनी सांगितले.