मुंबई: चांदीवली येथील म्हाडा वसाहतीमधील निसर्ग हाऊसिंग सोसायटीमधील इमारत क्रमांक दहा मधील दोन माळ्यांचा  स्लॅब कोसळला आहे. अग्निशमन आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. सुदैवाने या दोन्ही घरात कोणी रहाण्यास नव्हते म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही. सुमारे तीस वर्षे जुनी ही इमारत असल्याचं सांगण्यात येतंय.


आज दुपारच्या दरम्यान ही घटना घडली आहे. चांदीवली या ठिकाणी असलेल्या या इमारतीचे बांधकाम साधारणपणे 1992-93 च्या दरम्यान झालेलं आहे. या इमारतीच्या दहाव्या मजल्यावरील 105 क्रमांकच्या घरात दुरुस्ती चे काम सुरू होतं. यावेळी हा स्लॅब कोसळला. सुदैवाने ही दुर्घटना घडली त्यावेळी घरात कोणी नव्हतं. त्या ठिकाणी केवळ एक मजूर काम करत होता आणि तो किरकोळ जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. 


ही घटना घडल्यानंतर या ठिकाणी अग्निशमन दल, स्थानिक पोलीस पोहोचले आहेत. तर स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर आता जुन्या इमारतींच्या स्थितीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामध्ये प्रशासनाने लक्ष घालावं आणि या जुन्या इमारती दुरुस्त करुन द्याव्यात अशी मागणी आता स्थानिकांतून व्यक्त केली जात आहे. 


दरम्यान, मुंबईतील जुन्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला असून अशा प्रकारच्या घटना या आधीही घडल्या आहेत. पावसाळ्यात अनेक इमारती कोसळण्याच्या घटना गेल्या वर्षी घडल्या आहेत. महापालिका तसेच न्यायालयाने यासंबंधी अनेकदा आदेश देऊनही अशा जीर्ण झालेल्या इमारतींमध्ये लोक राहतात.


महत्त्वाच्या बातम्या: