Mumbai Police Deven Bharati:  भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी देवेन भारती (Deven Bharati) यांची बुधवारी 'मुंबई पोलिसांचे विशेष आयुक्त' (Special Commissioner Of Mumbai Police) म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई पोलीस दलात (Mumbai Police) नवीन पदनिर्मिती करण्यात आली असल्याची माहिती एक अधिकाऱ्याने दिली. राज्याच्या गृह विभागाने नियुक्तीचे आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच, मुंबई पोलिस दलात विशेष पोलिस आयुक्त पद सुरू केले असून IPS देवेन भारती यांची प्रथम विशेष पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. देवेन भारती यांच्याकडे आर्थिक गुन्हे शाखा आणि  इतर काही महत्त्वाच्या विभागांची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. 


राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, प्रशासकीय निकड म्हणून पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या अधिपत्याखाली पोलीस सहआयुक्तांच्या कामावर अधिक प्रभावीपणे पर्यवेक्षण करण्यासाठी, “अपर पोलीस महासंचालक' दर्जाच्या पदाची आवश्यकता विचारात घेऊन, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनी मर्या. यांच्या आस्थापनेवरील “संचालक, सुरक्षा व अंमलबजावणी” हे “अपर पोलीस महासंचालक” दर्जाचे पद, पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई, यांच्या आस्थापनेवर वर्ग करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचे राज्य सरकारच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या पदाला “विशेष पोलीस आयुक्त” असे संबोधण्यात येणार आहे. विशेष पोलीस आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्तांच्या यांच्या अधिपत्याखाली असणार आहेत. गृह विभागाच्या आदेशानुसार सर्व पोलीस सहआयुक्त हे देवेन भारती यांना रिपोर्ट करणार आहेत. तर,  विशेष पोलीस आयुक्त हे पोलीस आयुक्तांना रिपोर्ट करणार आहेत. 


देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय


1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले देवेन भारती हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात. वर्ष 2014 ते 2019 पर्यंत देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेन भारती हे पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) होते. त्यानंतर, त्यांना अतिरिक्त पोलिस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकाची जबाबदारी देण्यात आली होती. वर्ष 2019 मध्ये जेव्हा महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले. त्यानंतर भारती यांना साईड पोस्टींग देण्यात आली. त्यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली. 


देवेन भारती यांची 13 डिसेंबर 2022 रोजी वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त असताना बदली झाली होती. त्यांची जागा राजवर्धन यांनी घेतली होती. तेव्हापासून ते एटीसप्रमुख विनीत अग्रवाल, ठाणे येथील पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह आणि एसीबीचे अतिरिक्त महासंचालक प्रभात कुमार यांच्यासोबत देवेन भारती हेदेखील नवीन पोस्टिंग मिळण्याची प्रतीक्षा करत होते.


हाय प्रोफाइल प्रकरणांचा तपास


मुंबईतील काही हाय-प्रोफाइल प्रकरणांसह शहरातील काही महत्त्वाच्या तपासांमध्ये देवेन भारती यांचा समावेश होता. 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा तपास, 'मिड-डे' या वृ्त्तपत्राचे वरिष्ठ गुन्हे संपादक जे डे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पथकात त्यांचा समावेश होता. राज्यातील इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा कणा मोडण्यासाठीही देवेन भारती ओळखले जातात. 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला फाशीची शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारने काही मोजक्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी टाकली होती. त्यामध्ये देवेन भारती यांचा समावेश आहे. 


हे ही वाचा: