मुंबई : मुंबई पोलिसांना आव्हान देणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे. वेष बदलून नागरिकांचे मोबाईल फोन आणि दुचाकी चोरणाऱ्या एका सराईत टोळीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच मोटरसायकल आणि 100 पेक्षा जास्त मोबाईल फोन जप्त केले आहेत. मुंबई उपनगरात या टोळीने दहशत माजवली होती. "आम्ही मुंबईतील सर्वात मोठे स्नॅचर आम्ही आहोत. आम्हाला पोलीस कधीच पकडू शकत नाहीत, असा आत्मविश्वास या टोळीला होता. परंतु आपल्याला पोलिसांनी पकडलं यावर आरोपींचा विश्वास बसत नव्हता," अशी माहिती आरे पोलिसांनी दिली.
मुंबईमध्ये फूटपाथवरुन आणि रस्त्याच्या कडेला चालणाऱ्या नागरिकांचे तसंच रिक्षातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या हातामधून मोबाईल फोन खेचून चोरणाऱ्या टोळीला आरे पोलिसांनी अटक केली. गोरेगाव पूर्व इथल्या विरवानी बेस्ट बस स्टॅण्डवर गस्त घालत असताना, मोटरसायकलवरुन दोन तरुणांच्या संशयास्पद हालचाली दिसल्या. पोलिसांनी हटकलं असताना त्यांनी तिथून पळ काढला. परंतु पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता ही टोळी मोबाईल फोन आणि दुचाकींची चोरी करत असल्याचं निष्पन्न झाले. यापूर्वी अॅक्टिव्हा गाडी चोरताना ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.
आरीफ खाटीक (19 वर्ष), राघव चव्हाण (19 वर्ष), अब्दुल खान (21 वर्ष) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. या आरोपींवर बोरीवली, कांदिवली, समतानगर, गोरेगाव, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई अशा विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. हे सर्व आरोपी आपली ओळख पोलिसांना कळू नये यासाठी वेषांतर करायचे. पोलिसांनी त्यांच्याकडून पाच मोटरसायकल आणि 100 पेक्षा जास्त मोबाईल फोन जप्त केले आहेत. त्यांचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.