मुंबई : एबीपी माझाने 2 दिवसांपूर्वी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे पगारातून कापण्यात येत असलेले एलआयसीचे हफ्ते एसटी महामंडळाकडून एलआयसीच्या खात्यात मागील 4 महिन्यांपासून वर्ग करण्यात आले नसल्याची बाब उघडकीस आणली होती. याबाबत अनेक कर्मचाऱ्यांना पॉलिसी लॅप्स होत असल्याचे मेसेज येत असल्याचे देखील उघडकीस आणले होते. या बातमीचा एबीपी माझाने पाठपुरावा केल्या नंतर अवघ्या 48 तासांत एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांचे मागील 4 महिन्यांचे थकीत हफ्ते एलआयसीकडे वर्ग केले आहेत. याबाबतची माहिती एबीपी माझाला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे. 


याबाबत एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयातून तब्बल 15 कोटी रुपयांची रक्कम एसटी महामंडळाला देण्यात आली आहे. यामधून एलआयसीची थकीत रक्कम आणि इपीएसची थकीत रक्कम एसटी महामंडळाने भागवली आहे. मागील काही दिवसांपासून एसटी महामंडळाचे आर्थिक चलन बंद असल्यामुळे आशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली असल्याचं म्हंटल आहे. 


याबाबत बोलताना महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांच्या एलआयसीचा हप्ता न भरल्यामुळे कर्मचाऱ्यांना मागील काही  दिवसांपासून त्यांची एलआयसीची पाॅलिसी लॅप्स होत असल्याचे मेसेज होते. त्यामुळे अशा काळात एखाद्या  कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याची भरपाई कोेण देणार असा सवाल आम्ही उपस्थित केला होता. राज्य परिवहन महामंडळ प्रत्येक महिन्याला कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एलआयसीचा हप्ता कापून घेते. हाच मागील 4 महिन्यांचा हप्ता एसटी महामंडळाने कापून घेतला खरा परंतु त्याची रक्कम ही एलआयसीला भरलीच नव्हती त्यामुळे अनेकांना आपली एलआयसी पाॅलिसी लॅप्स होत असल्याचे मेसेज येत होते. धक्कादायक बाब म्हणजे जी रक्कम एसटी महामंडळाने भरली नाही ती तब्बल 20 कोटी रुपये असल्याची आम्हाला माहिती होती. एसटी महामंडळाने कोव्हीड काळात मरण पावलेल्या 239 कर्मचाऱ्यांपैकी केवळ 9 कर्मचाऱ्यांनाच मदत केली आहे. एलआयसीचा हप्ता थकवण्यात आला त्या मागील 4 महिन्यांच्या काळात 100 ते 150 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता या इतर मृत नारिकांच्या नातेवाईकांना भरपाई कोण देणार. हा प्रश्न कायम होता. म्हणूनच आम्ही आमच्या  संघटनेच्या वतीने परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांना पत्र दिले होते. अखेर आता पैसे वर्ग करण्यात आले आहेत. यासाठी एबीपी माझाने पाठपुरावा केला आहे. माझाचे खूप आभार. 


याबाबत बोलताना, इंटकचे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले की, आम्ही हा विषय मंत्री सतेज पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांनी तत्काळ आपण निर्णय घेऊन पैसे वर्ग करू असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता खात्यात पैसे जमा झाले आहेत. यासाठी एसटी महामंडळाचे आणि मंत्र्यांचे खूप आभार. यासोबतच एबीपी माझाचे देखील खूप आभार असं तिगोटे म्हणाले.