Mumbai Covid Center Scam :  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात आज दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्यावतीने ही कारवाई करण्यात आली आहे. सोमय्या यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्याचा तपास सुरू आहे. राजीव साळुंके आणि सुनील कदम अशी आरोपींची नावे आहेत. या घोटाळा प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोमय्यांनी आरोप केले होते. 


भाजप नेते किरीट सोमय्या यांनी घोटाळ्याचा आरोप करत या प्रकरणात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखा आणि ईडीकडून याचा तपास सुरू होता. हा घोटाळा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला असून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दबावाखाली हे कंत्राट संजय राऊत यांच्या सांगण्यावरून या कंपनीला दिला गेल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. 






आरोपी राजीव नंदकुमार साळुंखे हे परळ रुग्णालयाजवळील चहाचे दुकान आहे. त्यांच्यासह सुनील कदम यांना अटक करण्यात आली होती. या दोघांविरोधात भारतीय दंड विधान 420, 406, 465, 467, 468, 471, 304(A) अंतर्गत अटक करण्यात आली. दोन्ही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने दोन्ही आरोपींना 6 मार्च 2023 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास करून प्रथमदर्शी पुराव्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 


सुनील कदम आणि राजीव साळुंके हे लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस चालवत होते. कोरोना काळात कोविड सेंटर आणि वैद्यकीय उपकरण खरेदी कंत्राटमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी  केला होता. या घोटाळ्यात संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकरदेखील असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता.