मुंबई : मुंबईकरांना राज्य सरकारने मोठं गिफ्ट दिलं असून 500 स्क्वे. फुटापर्यंतच्या घरांना यापुढे मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शिवसेना आश्वासनं नाही तर वचननामा देते आणि ते पाळते असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. देशाचे आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईकरांना हा दिलासा देण्याचा प्रयत्न असून ज्यांनी कष्ट करून, घाम गाळून मुंबईला उभं केलं त्यांच्यासाठी हा निर्णय आहे. त्यांच्यासाठीच्या वचनाला आपण आज जागलो आहोत असंही मुख्यमंत्री म्हणाले. 


मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज नगरविकास खात्याची एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबईतील 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा सर्वसामान्यांना होणार असून जवळपास 16 लाखांहून अधिक कुटुंबियांना याचा फायदा होणार आहे. 


शिवसेना वचननामा देते, आणि ती पाळते असं सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "मुंबईकरांना 500 स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं वचन 2017 साली दिलं होतं. ते आता शिवसेनेनं पाळलं. मुंबईकरांनी शिवसेनेवर भरभरुन प्रेम केलं. या मुंबईकरांना दिलेल्या वचनाला आज शिवसेना जागली आहे."


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, "1966 पासून जन्माला आलेली शिवसेना मुंबईकरांच्या आशीर्वादाने मुंबई सांभाळतेय. आमची ही चौथी पिढी, आजोबा, वडील, मी आणि आता आदित्य. काम म्हणून नाही, कर्तव्य म्हणून नाही तर मुंबईवरचं प्रेम आम्ही पुढे नेत आहोत. शिवसेनाप्रमुख स्वत: जाऊन कामाची पहाणी करत. मीही नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल  किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल ते जाऊन पहात होतो आता हे काम आदित्य करत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :