मुंबई: काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस दलातील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या विशाल पवार या कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. सुरुवातीला विशाल पवार (Vishal Pawar) याने फटका गँगने आपल्याला विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा केला होता. यानंतर काही तासांतच त्याचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर रेल्वे पोलिसांनी (Railway Police) याप्रकरणाचा तपास सुरु केला होता. या तपासात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिस दलातील शिपाई विशाल पवार मृत्यू प्रकरणी रेल्वे पोलिसांनी बी समरी अहवाल न्यायालयात दाखल केला आहे. 28 एप्रिल रोजी लोकल ट्रेनमधून (Mumbai Local Train) प्रवास करत असताना माटुंगा येथे फटका गँगने (Fatka Gang) मोबाईल हिसकावल्याचा दावा विशालने केला होता. चोरांचा पाठलाग केला त्यावेळी त्यांनी विषारी इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं असे विशालने तक्रारीत म्हटले होते. उपचारादरम्यान विशालचा मृत्यू झाला होता. रेल्वे पोलिसांनी घटनेचं गांभीर्य ओळखून सीसीटीव्ही आणि मृत व्यक्तीचे मोबाईल फोन, सीडीआर आणि लोकेशन तपासल्यानंतर विशाल त्यावेळी घटनास्थळी असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नव्हते. तपासात वेगळीच माहिती समोर आली होती. अतिमद्यपान सेवन केल्यामुळे विशाल हा ड्युटीवर हजर न राहिल्याने त्याने हा बनाव रचल्याचे पुढे तपासात समोर आले. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी आता हा गुन्हा रद्द करण्याबाबत न्यायालयात बी समरी रिपोर्ट सादर केला आहे.
विशाल पवार रात्री 12 वाजता दादरमधील कैलास लस्सीच्या दुकानाजवळ दिसला
विशाल पवारच्या मृत्यूनंतर मुंबईत एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने आणि कसून याप्रकरणाचा तपास सुरु केला. रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर विशाल पवारने दावा केल्याप्रमाणे त्याच्यात आणि चोरांमध्ये कोणतीही झटापट झाली नसल्याने आढळून आले. विशाल पवार याने 28 एप्रिलच्या रात्री साडेनऊ वाजता लोकल ट्रेनच्या दरवाजात उभे असताना फटका गँगने आपला मोबाईल हिसकावल्याचे म्हटले होते. त्यानंतर माटुंगा आणि सायन रेल्वे स्थानकांदरम्यान आपली चोरांशी झटापट झाली आणि त्यांनी आपल्या विषारी इंजेक्शन दिल्याचा दावा विशालने मृत्यूपूर्वी केला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तो दादरच्या कैलास लस्सी दुकानाजवळ असल्याचे दिसून आले होते.
आणखी वाचा