Mumbai Police Constable Vishal Pawar Died: मोबाईल चोरट्याचा (Fatka Gang) पाठलाग करताना चोरट्याने विषारी इंजेक्शन मारल्याने पोलीस शिवायी विशाल पवार (Vishal Pawar Died) यांच्या मृत्यूबाबत अनेक बातम्या समोर आल्या. मात्र पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असताना त्यांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं आहे. सीसीटीव्ही फुटेजद्वारे मिळालेल्या माहितीनूसार ही घटना मोबाईल चोरी आणि झटपट नसल्याचे पोलिसांना आढळून आले. तसेच विशाल पवार जबाबात खोटं बोलल्याचे देखील समोर आले आहे. 


विशाल पवार यांच्या मृत्यूबाबत आता एक नवीन माहिती समोर आली आहे. विशाल पवार हे दारूचे अतिसेवन करायचे. तसेच घटनेच्या दिवशी कामावर न गेल्यामुळे ही कथा त्यांनी रचल्याचा संशल पोलिसांना आहे. तसेच विशाल पवारने जबाबात सबंधित घटना साडेनऊ वाजता घडली असे सांगितले होते. मात्र घटनेच्या रात्री 12 वाजेपर्यंत तो दादरच्या कैलास लस्सी दुकानाजवळ असल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. त्यामुळे विशाल पवारचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणास्तव झाला हे तपासणे सुरू असून शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.


लोहमार्ग पोलीस काय म्हणाले?


सदर घटनेची माहिती मिळताच रेल्वे आयुक्तालयात वेगवेगळी पोलीस पथके नेमून तपास सुरु करण्यात आलेला असुन तपासात मृतक विशाल पवार यांनी कोपरी पोलीस ठाणे येथे दिलेल्या जबाबाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन, फलाट परिसर, रेल्वे ब्रिज, आस्थापना या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून त्याचा विविध तांत्रिक अंगाने तपास सुरु आहे.


फिर्यादीत नमूद वेळी व त्यानंतर सुमारे पाच ते सहा तास व त्यानंतरही मयत विशाल पवार हे सीसीटीव्ही फूटेज मध्ये इतरत्र ठिकाणी आढळले असून प्रथम दर्शनी फिर्यादीत नमूद वेळी व त्याच्या आसपास माटुंगा-सायन रेल्वे स्टेशन दरम्यान फटका मारुन मोबाईलची जबरी चोरी व त्यांच्यातील झटापटीची घटना घडली नसल्याचे दिसून येत आहे. मृतकाचा मृत्यु नक्की कोणत्या कारणाने झाला या विषयी विविध तांत्रिक व शास्त्रीय अंगाने तपास सुरु आहे. तपास युध्द पातळीवर सुरु असुन तपासाबाबत संपूर्ण सत्य समोर येण्याच्यादृष्टीने माध्यमांनी थोडा संयम दाखवून सहकार्य करण्याची विनंती आहे.


कलम 302, 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल


विशाल पवार यांच्याबाबत मोबाईल जबरी चोरीची व झटापटीची घटना घडल्याबाबतची माहिती मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयास दि.01.05.2024 रोजी संध्याकाळी प्राप्त झाली. सदर घटनेबाबत कोपरी पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे गुन्हा रजि.क्र.399/2024, कलम 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदरचा गुन्हा लोहमार्ग आयुक्तालयास वर्ग करण्यापूर्वी सदर गुन्ह्यातील फिर्यादी विशाल पवार हे मयत झाले होते. सदर गुन्ह्याची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर दादर रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजि.क्र.522/2024, कलम 302, 392, 394,328,34 भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला.


आणखी वाचा


पाठलाग, मारहाण अन् विषप्रयोग; फटका गँगच्या मागे गेलेल्या पोलिस कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यूचा रक्तरंजित थरार