मुंबई : एका पोलीस अधिकाऱ्यानं तपासात चूक केली, म्हणून संपूर्ण मुंबई पोलीस महिलांवरील अत्याचाराचा तपास गांभीर्यानं करत नाहीत असं म्हणणं चुकीचं ठरेल. महिलांवरील अत्याचाराचा तपास मुंबई पोलीस नेहमीच गांभीर्यानं करतात असं प्रतिज्ञापत्र मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केलं आहे. खरंतर प्रत्येक गुन्ह्याचा तपास हा गांभीर्यानंच केला जातो. त्यातही महिलांवरील अत्याचाराच्या तपासाला प्राधान्य दिलं जातं. मुंबई पोलिसांचा प्रमुख या नात्यानं प्रत्येक तपास योग्य प्रकार केला जात आहे की नाही, यावर लक्ष ठेवण्याची नैतिक जबाबदारी माझीच आहे असंही आयुक्तांनी या प्रतिज्ञापत्रातून नमूद केलं आहे.


काय आहे प्रकरण?


दिंडोशी पोलीस ठाण्यातील एका प्रकरणात आरोपीनं पीडितेचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. याप्रकरणात पीडितेचे कपडे जप्त करण्यात आले नाहीत. त्याची गंभीर दखल घेत त्याबाबतचं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायमूर्ती अजय गडकरी व न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठानं मुंबई पोलीस आयुक्तांना दिले होते. या आदेशानुसार हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय.


या प्रकरणात मुलीचे कपडे फाडण्याचा प्रयत्न झाला होता. याचा योग्य तपास करण्यात तपासअधिकारी अपयशी ठरला. पीडित मुलीचे कपडे जप्त करणं व त्याचा पंचनामा होणं आवश्यक होतं, जे झालं नाही. त्यामुळे तपासातील या त्रुटीचा फायदा आरोपीला झाल्याची कबुलीच या प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली आहे. 


या प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेलं आहे. मात्र आता पीडित मुलीचे तेव्हाचे कपडे जप्त करुन पंचनामा झाल्यानंतर त्याचं पुरवाणी आरोपपत्र दाखल करा, असे आदेश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही आयुक्तांनी या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केलं आहे.


याशिवाय पीडितेचे कपडे जप्त न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची चौकशी वरीष्ठ अधिकाऱ्याकडून केली जाईल. चौकशीत तो दोषी आढळल्यास त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, अशी हमी मुंबई पोलीस आयुक्तांनी या प्रतिज्ञापत्रातून दिली आहे.


ही बातमी वाचा: