मुंबई : शहरात टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून सर्रासपणे भाडे नाकारलं जात असल्याच्या अनेक घटना घडताना दिसतात. रात्री बेरात्री नागरिकांना अनेकदा या गोष्टींचा अनुभव येत असतो. आता त्याला नियंत्रण बसणार असून अशा मुजोर टॅक्सी आणि रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी (Mumbai Traffic Police) कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई पोलिसांनी आज टॅक्सी आणि रिक्षा चालकांची एक बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे. मुंबईत अनेकदा टॅक्सी चालक किंवा रिक्षा चालक हे जवळचे भाडे नाकारतात. रात्रीच्या वेळी ही गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. या संबंधी पोलिसांकडे अनेक तक्रारी येतात. आता यावर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.
मुंबई पोलिसानी याबाबत एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, रिक्षा आणि टॅक्सी चालक अनेकदा लांब पल्ल्याच्या भाड्यासाठी जवळचे भाडे नाकारतात. या बद्दलच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे भाडे नाकारणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. या बाबतचे फलक रेल्वे आणि बस स्थानकाबाहेर लावण्यात आले आहेत. भाडे नाकारण्याची तक्रार आल्यात संबंधितावर तात्काळ कारवाई करणं अपेक्षित आहे.
तसेच आपल्या विभागातील सर्व टॅक्सी आणि रिक्षा चालकांची एक बैठक बोलावून याबद्दलची माहिती देण्यात यावी असे आदेश सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत. जर भाडे नाकारण्याची तक्रार आलीच तर संबंधितावर मोटार वाहन कायदा 178 (3) (MVA section 178 (3)) अन्वये कारवाई करण्यात यावी असे आदेशही पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.
आता मुंबई पोलिसांच्या कारवाईच्या इशाऱ्यानंतर भाडे नाकारणाऱ्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांच्या वर्तनात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.