Diwali 2022: मागील दोन वर्षांपासून असलेल्या कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट मोठ्या प्रमाणावर दूर झाल्याने या वर्षापासून सण, उत्सव उत्साहात आणि निर्बंधाशिवाय साजरे केले जात आहेत. गणेशोत्सवापासून बाजारात आलेला उत्साह दिवाळीत (Diwali Celebration) शिगेला पोहचला आहे. महागाईची झळ असूनही खरेदीसाठी लोकांचा ओढा दिसत आहे. तर, दुसऱ्या बाजूला विक्रेते, दुकानदारांनाही दिवाळीकडून मोठ्या अपेक्षा आहेत.


कोरोना महासाथीच्या संकटामुळे मागील दोन वर्ष सण-उत्सव निर्बंधासह साजरे झाले होते. तर, दुसरीकडे बाजारपेठेतही खरेदीचा फारसा उत्साह दिसून येत नव्हता. मात्र, कोरोना संकट सरल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर येत असल्याचे चित्र आहे. दिवाळीपूर्वीच्या रविवारी, मुंबई-ठाण्यासह अनेक मुख्य बाजारपेठेत सहकुटुंब अनेकांनी खरेदी केली होती. त्यानंतर आजही खरेदीचा उत्साह दिसून येत आहे. सोमवार असूनही दादर येथे खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. दादरमधील न.चिं. केळकर मार्ग, भवानी शंकर मार्ग या ठिकाणी वाहतूक कोंडी दिसून येत असल्याचे मुंबई वाहतूक पोलिसांनी ट्वीटरवर सांगितले आहे. 










शनिवारी-रविवारी खरेदीचा उत्साह


दिवाळीनिमित्त, फराळाचे साहित्य, सुकामेका, कपडे, फटाके खरेदी करण्यासाठी शनिवारी-रविवारी अनेकजण सहकुटुंब खरेदीसाठी बाहेर पडले होते. मुंबईतील महात्मा फुले मंडई परिसर (क्रॉफर्ड मार्केट), मशीद बंदर, दादर आदी ठिकाणी, तर, ठाण्यातील जांभळी नाका, गोखले रोड, राममारुती रोड आदी ठिकाणी खरेदीसाठी गर्दी उसळली होती.


कंदील, पणती, सजावटीचे साहित्य, किल्ले तयार करण्यासाठीचे साहित्य आदींपासून कपडे खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू होती. फेरीवाल्याकडेही लोकांची गर्दी असून दुकाने, मॉलमधूनही खरेदी करण्यासाठी प्राधान्य दिले जात आहे. 


महागाईची झळ


दोन वर्षानंतर सण उत्साहात साजरे होत असले तरी याला महागाईची झळ बसत आहे. मात्र, दिवाळीत मिळणाऱ्या बोनसमुळे, काही प्रमाणात असलेल्या बचतींमुळे महागाईची झळ सोसूनही खरेदीकडे लोकांचा ओढा दिसत आहे. तर, दुसरीकडे दोन वर्ष आर्थिक फटका बसल्यानंतर यंदा काही प्रमाणात नुकसान भरून निघेल असा विश्वास दुकानदार, विक्रेत्यांना आहे. यंदाच्या दिवाळीत मोठी उलाढाल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट असले तरी दिवाळीच्या खरेदीवर मंदीची गडद छाया दिसत नाही.