मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) आणि इतर 5 पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे. भाईंदर येथील विकासक (बिल्डर) श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह येथे परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध 15 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. 


मरीन ड्राईव्ह येथे नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातील तक्रारदार श्यामसुंदर अग्रवाल यांच्या विरोधात मुंबईतील जुहू पोलीस स्टेशन येथे मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुन्ह्याचा तपाससुद्धा याच एसआयटीकडून केला जाणार आहे.


श्याम सुंदर अग्रवाल यांचा अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलशी संबंध असल्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र श्याम सुंदर अग्रवाल यांनी हा आरोप फेटाळत परमबीर सिंह आणि त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याकडून खंडणी उकळण्यासाठी संजय पुनम जो आधी श्याम सुंदर अग्रवालचा व्यावसायिक भागीदार होता, त्याच्यासोबत मिळून हा खोटा गुन्हा नोंदवला असल्याचं श्याम सुंदर अग्रवाल यांनी सांगितलं आहे. संजय पुनमियाला मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. 


पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी या एसटीचा प्रमुख असेल तर सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाचा अधिकारी या तपासाचा तपास अधिकारी म्हणून काम करेल. पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक आणि सहायक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा या एसआटीमध्ये समावेश असणार आहे.


हे प्रकरण मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंह तसेच मुंबई पोलीस दलातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध असल्यामुळे या एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. जेणेकरून या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा. ही एसआयटी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे आणि सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना रिपोर्ट करणार आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधात एकूण तीन गुन्हे दाखल आहेत. मुंबईत एक तर ठाण्यामध्ये दोन असे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसात परमबीर सिंह यांच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :