ठाणे : ठाणे आणि मुंबई शहराचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि पाण्यात काही वर्ष गुन्हे शाखेचे उपायुक्त राहिलेले पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्याविरोधात खंडणीचा आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईतील खंडणीच्या गुन्ह्यात नंतर परमबीर सिंह यांच्यावर दाखल झालेला हा दुसरा गुन्हा आहे. शरद अग्रवाल या व्यक्तीने ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडळ 5 मध्ये येणाऱ्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि पराग मनेरे यांच्यासह आणखीन तीन जणांवर विविध कलमांचा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 


मुंबईत दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्या प्रमाणेच ठाण्यात देखील विविध खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देऊन परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त पराग मणेरे, संजय पूनामिया, सुनील जैन, मनोज घोटकर यांनी खंडणी घेतली असल्याचे तक्रारदार शरद अग्रवाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे. "मला व माझ्या भाऊ शुभम याला खोट्या केसमध्ये अडकवण्यात येणार होते. ते करू नये यासाठी आमच्याकडून 2016 ते 2018 या कालावधीत दोन कोटी रुपये वसूल करण्यात आले आणि माझ्या आईच्या नावावर असलेली भाईंदर येथील, आठ कोटींची जमीन निव्वळ 1 कोटी रुपयांमध्ये खरेदी खत बनवून खंडणीद्वारे त्यांनी घेतली, असे शरद यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर माझे काका शामसुंदर अग्रवाल यांच्यावर मोक्का केस टाकण्याची धमकी देऊन चेकद्वारे 2 कोटी 68 लाख रुपये त्यांनी घेतले तसेच नाशिक येथील काकांच्या नावावर असलेल्या जमिनीचे हक्क स्वतःच्या नावावर खंडणी म्हणून त्यांनी करून घेतले. अशा प्रकारे 4 कोटी 68 लाख रुपये आणि 2 जमिनी आमच्याकडून जबरदस्ती खंडणी म्हणून त्यांनी वसूल केल्या आहेत, असंही शरद यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. 


शरद यांच्या जबाबनुसार ठाणे पोलिसांनी, खंडणी मागितल्या प्रकरणी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध कलम 384, 385, 388, 389, 420, 364 ए, 34, 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात केला आहे. परमबीर सिंह व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांचीही नावे या गुन्ह्यात आहेत. परमबीर सिंह हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना मनेरे हे त्यावेळी ठाण्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी होते.


याआधी, परमबीर सिंह, डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे. 


सध्या संजय पुनमिया आणि सुनील जैन हे मुंबई पोलिसांच्या कस्टडीमध्ये आहेत. कोपरी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यात गरज लागल्यास त्यांची कस्टडी घेऊ, तसेच परमबीर सिंग आणि पराग मणेरे यांना देखील पुरावे आढळल्यास चौकशीसाठी बोलावू असे ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी एबीपी माझाला सांगितले आहे. यातील मनोज घोटकर याला अद्याप अटक झालेली नसून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.