मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेला उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रांवरची कारवाई ही सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करूनच करण्यात असल्याचा दावा राज्य सरकारनं मंगळवारी हायकोर्टात केला. त्याची दखल घेत राज्य सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय राज कुंद्राला कोणताही तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला.


राज कुंद्राला 19 जुलै रोजी अश्लील चित्रपटांना पैसे पुरवण्याच्या आणि ते इंटरनेटवर अपलोड केल्याच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. दंडाधिकारी न्यायालयानं त्याला मंगळवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र ही अटकच बेकायदेशीर असल्याचा दावा राज कुंद्रानं या याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयात केला आहे. कोणतीही कायदेशीर नोटीस न बजावता आपल्याला अटक करण्यात आली. त्यामुळे ही अटक कायद्याचं पालन न करता करण्यात आल्यानं ती पूर्णपणे बेकायदेशीर आहे. तसेच जप्त करण्यात आलेलं साहित्य हे पॉर्नोग्राफीच्या परिभाषेतही बसत नसल्याचा दावाही कुंद्राच्यावतीनं करण्यात आलाय. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांच्यापुढे सुनावणी होणं अपेक्षित होतं मात्र काही कारणास्तव हे कोर्ट कामकाजासाठी उपलब्ध नसल्यानं त्यावर न्यायमूर्ती अजय गजडकरी यांच्यासमोर तातडीची सुनावणी पार पडली. 


तेव्हा, राज्य सरकारकडून कुंद्राच्या याचिकेवर तीव्र विरोध करण्यात आला. राज कुंद्रांवर सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करूनच कारवाई केल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला. तसेच सदर प्रकरणात आम्ही काही पीडितांच जबाबही नोंदवल्याचं मुंबई पोलिसांतर्फे कोर्टात सांगण्यात आलं. जबाबही नोंदवले असून तपासासंदर्भातील सर्व कागदपत्रं न्यायालयात सादर करू असेही राज्य सरकारच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. त्याची दखल घेत आम्ही एकतर्फी कोणताही निर्णय देऊ शकत नाही. असे स्पष्ट करत न्यायालयाने कुंद्रांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश राज्य सरकारला देत सुनावणी शुक्रवार 29 जुलैपर्यंत तहकूब केली.


सदर याचिकेवर मंगळवारी सकाळी नाट्यमय घडामोडी पहाला मिळाल्या. नियमित खंडपीठासमोर सुनावणी होऊ न शकल्यामुळे कुंद्रांच्या वकिलांनी न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्याकडे धाव घेतली. तेव्हा, या याचिकेवर इतक्या तातडीच्या सुनावणीची गरज काय? असा सवाल उपस्थित करत नियमित खंडपीठाकडे सुनावणी होण्याची वाट का नाही बघितली?, अशी तातडीने सुनावणी घेता येणार नाही, तुम्हाला दिवसाचं कामकाज संपेपर्यंत वाट पाहावी लागेल असं सांगितले. यावर थांबण्याची तयारी राज कुंद्रांच्या वकिलांनी दाखवल्यावर या याचिकेवर दुपारी 4 नंतर सुनावणी पार पडली.


दरम्यान याच प्रकरणात राज कुंद्राला मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 292, 293 (अश्लील सामग्रीची विक्री), 420 (फसवणूक) तसेच कलम 67 आणि 67 ए (लैंगिक सामग्रीचे प्रसारण) माहिती तंत्रज्ञान कायदा आणि महिलांशी असभ्य वर्तनाच्या तरतुदींखालील विविध गुन्हे कुंद्रावर दाखल करण्यात आला आहे.