मुंबई : पोलीस प्रशासनावरील वाढणारा ताण लक्षात घेत आता मुंबई पोलिसांकडून 1100 नागरिकांना विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. या नागरिकांच्या माध्यमातून मुंबईतील ज्या इमारती सील करण्यात आलेल्या आहेत. त्या इमारतींची देखरेख करणे यासोबतच परिसरामध्ये नागरिकांची गर्दी झाली असेल तरी याबाबत स्थानिक पोलिस स्टेशनला माहिती देणे, इमारतींमधील कोरोना बाधित रुग्णांची मदत करणे यासोबतच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी नागरिक आणि पोलिस यांच्यामध्ये समन्वय निर्माण व्हावा यासाठी विशेष काळजी घेणे अशी जबाबदारी या विशेष पोलिस अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.  


सध्या झोपडपट्टी परिसरात अनेक वेळा पोलीस परिसरातून गेल्यानंतर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली आहे. 10 एप्रिल ते 30 एप्रिल अखेर या सर्व विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक असणार आहे. याबाबतचं पत्र देखील त्यांना पोलिस प्रशासनाकडून देण्यात आलेलं आहे. याबाबत बोलताना पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी डीसीपी एस चैतन्य म्हणाले की, लॉकडाऊनचे नियम झुगारून विनाकारण रस्त्यावर भटकणाऱ्या नागरिकांना आवरण्यासाठी पोलिसांनी परिसरातील विश्वासातील तरुणांची फौज तयार करून त्यांची विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. सध्या ही फौज कार्यरत आहे. पोलिसांना दैनंदिन कामकाज, गुन्ह्यांचा तपास आरोप पत्र तयार करण्यापासून कायदा सुव्यवस्था राखण्याचे आणि संचार बंदीच्या काटेकोर अंमलबजावणीचे काम करावे लागत आहे. त्यात अपुऱ्या मनुष्यबळामुळे कामाचा ताण वाढत आहे. अनेक पोलिसांना रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग यासारखे आजार आहेत. अनेकांची शारीरिक स्थिती चांगली नाही. अनेकांना आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत त्यामुळे प्रशासनावरील ताण कमी व्हावा या उद्देशाने विशेष पोलीस अधिकारी म्हणून 1100 जणांची तात्पुरत्या स्वरूपाची नेमणूक करण्यात आली आहे. 




कोणत्याही शहराचे पोलीस आयुक्त अथवा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक किंवा दंडाधिकारी अशा तिघांनाही हे अधिकार आहेत. या अधिकाराचा वापर करत पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या आदेशान्वये मुंबईत विशेष पोलिस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. झोपडपट्टी असलेल्या उपनगरांमध्ये पोलिसांची पाठ फिरताच नागरिक पुन्हा रस्त्यावर येतात, दुकाने पुन्हा सुरू होतात असा अनुभव आहे त्यांना घरी पाठवण्यासाठी किंवा गर्दीची माहिती परिसरातील घडामोडींची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचण्यासाठी अशा पोलिसांची मदत होत आहे. यात नोकरदार तसेच व्यावसायिक तरुणांचा समावेश आहे. त्या तरुणांना 10 ते 30 एप्रिल पर्यंत विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती पत्रही दिले आहे. 


याबाबत बोलताना परळी येथील रहिवासी केतन सीरिया म्हणाले की, सध्या कोरोना बाधितांचे संख्या वाढत आहे. याचं प्रमाण सोसायट्यांमध्ये देखील जास्त पाहायला मिळत आहे. अशा ठिकाणी काम करण्यासाठी आम्ही पोलिसांना मदत करत आहोत. सध्या अनेक सोसायट्या मुंबईतील सील आहेत. त्या सोसायट्यांच्या बाहेर होमगार्ड किंवा पोलीस कॉन्स्टेबल बसवण्यात आले आहेत. त्यांना मदत व्हावी या हेतूने अशा पद्धतीचे अधिकार आम्हाला देण्यात आले आहेत. आम्ही परिसरातील कोरोना बाधित रुग्णांना मदत लागत असेल तर त्यांना मदत करू याशिवाय परिसरामध्ये गर्दी झाल्यास किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही पोलिसांशी तत्काळ संवाद साधू शकतो. सध्याची परिस्थिती ही आरोग्य आणीबाणीची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीत आम्हाला काम करायची संधी मिळाल्यामुळे आम्हाला आनंद होत आहे.