Mumbai Police : मुंबईत पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची कोणतीही कमतरता भासणार नाही, त्याचा पुरेपूर साठा उपलब्ध आहे, त्यामुळे अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मुंबईकरांना केलं आहे. देशभरातल्या मालवाहतूक संघटनांनी पुकारलेल्या बंदनंतर अनेक ठिकाणी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीची कमतरता भासत आहे. 


काय म्हटलंय मुंबई पोलिसांनी? 


मुंबईमध्ये पेट्रोल, डिझेल व सीएनजी यांची कमतरता भासणार नाही याची आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. मुंबईमध्ये या इंधनाचा पुरेपूर साठा उपलब्ध असून समाजमाध्यमांमध्ये पसरत असलेल्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊन नागरिकांनी पेट्रोल व डिझेल भरण्याकरिता गर्दी करणे टाळावे ही विनंती. तसेच आम्ही या इंधनांची वाहतूक करणाऱ्या टँकर्सना पूर्ण सुरक्षा पुरवत आहोत. आपणास विनंती आहे की ही माहिती आजूबाजूच्या इतरांना सुद्धा कळवा


 






देशभरातल्या वाहतूकदारांचा संप


हिट अँड रन कायद्याला विरोध करण्यासाठी देशभरातल्या मालवाहतूकदारांनी बेमुदत पुकारला आहे. त्याचा मोठा फटका सर्वसामान्यांना बसल्याचं दिसून येतंय. पेट्रोल पंपांवर पेट्रोलचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक भागात पेट्रोल मिळेनासं झालं. तर पेट्रोल न मिळण्याची शक्यता गृहीत धरत अनेक भागात पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली. पेट्रोल भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे वाहतूकदारांच्या संपामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक घटली. यामुळे भाजीपाला महाग होऊ शकतो. 


परराज्यातून येणाऱ्या गाड्या कमी आल्या. राज्यातून 400 ते 425 गाड्याच एपीएमसीत आल्या. नेहमीपेक्षा 100 ते 150 गाड्यांची आवक कमी झाली. त्यामुळे भाजीपाला 20 ते 25 टक्के महागला. अनेक भागात पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने स्कूलबसही रस्त्यावर येऊ शकल्या नाहीत. ख्रिसमस, न्यू ईयरची सुट्टी संपून अनेक भागात आज शाळा सुरू होणार होत्या. मात्र स्कूलबस न आल्याने अनेकांच्या शाळा बुडल्या. तर संपाचा मोठा परिणाम एलपीजी सिलेंडर पुरवठ्यावर झाला. एलपीजी सिलेंडरचा पुरवठा बहुतांश भागात झालेला नाही त्यामुळे घरगुती ग्राहक आणि हॉटेल व्यावसायिक यांना या संपाचा मोठा फटका बसलाय. 


ही बातमी वाचा;