मुंबई  : मुंबई पोलिसांनी एका आईवडिलांनी सोडून दिलेल्या बालकाचं पालकत्व स्वीकारलं आहे. त्याचं नामकरण पोलिसांनीच शौर्य असं केलं आहे. शौर्यला जन्म देणारे आई-बाप त्याला सोडून गेल्यावर त्याचं पालकत्व मुंबई पोलिसांनी आपल्या खांद्यावर घेतलं होतं. डिसेंबर 2020 मध्ये कुपर रुग्णालयात बाळाचा जन्म झाल्यानंतर आई-वडील त्याला सोडून निघून गेले. जुहू पोलिसांनी त्यांना शोधून पुन्हा रुग्णालयात. त्यांची समजूत काढली. मात्र पुन्हा तीन दिवसांनंतर त्यांनी पळ काढला आणि अद्यापही या तान्हुल्याच्या आई-वडीलांचा शोध लागला नाही. अशात मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांनी स्वत: पुढे रुग्णालयातील नर्स, डॉक्टर, सामाजिक संस्थांच्या माध्यामातून ह्या बाळाचे खऱ्या अर्थाने पालक झाले आहेत. 


मुंबई पोलिसांनीच या बाळाचे नामकरण करत त्याचे नाव शौर्य असे ठेवले आहे. आता हे बाळ आठ महिन्यांचे झाले असून शौर्यला दत्तक घेण्यासाठी अनेकांकडून विचारणा देखील होत आहे. 


आठ महिन्यांपूर्वी कुपर रुग्णालयात पाच दिवसाच्या बाळाला त्याचे आई-वडील सोडून गेल्याचा फोन डिसेंबर 2020 मध्ये जुहूपोलिसांना आला. वरीष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत माने यांच्या मार्गदर्शनाखाली जुहू पोलीसांचे पथक रुग्णालयात दाखल झाले. यावेळी पोलिस उपनिरीक्षक पूनम मिरगणे यांच्यासह त्यांच्या चमूने आई-वडिलांना शोधण्याची मोहीम हाती घेतली. रुग्णालयात नोंदवलेल्या पत्त्यानुसार त्यांनी जुहू परिसर 5-6दिवस पिंजून काढल्यानंतर त्यांना ते सापडले. यावेळी त्या दोघांचीही पोलिसांनी समजूत काढली आणि त्यांना रुग्णालयात आपल्या बाळा जवळ घेऊन गेले. 


पोलीस निरीक्षक पूनम मिरगणे सांगतात, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना वाटलं त्यांचा बच्चू जिवंत नाही. तेव्हा आम्ही त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो. कोरोनाचा काळ होता. अशात बाळाला काही होऊ नये म्हणून आम्ही पीपीई किटमध्ये त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, दोनच दिवसात पुन्हा बाळाची आई पळून गेल्याचं कळलं. अशावेळी आम्ही त्यांचे घर गाठले तेव्हा त्यांनी घरच सोडले होतो. घरमालकाला देखील याची कल्पना नव्हती. त्यांचा शोध लागू नये म्हणून मोबाइल मधले सिमकार्ड देखील त्यांनी काढून टाकले होते. त्यामुळे त्यांचा शोध लागणे देखील अवघड झाले होते. या जोडप्याला आधीच एक 14 वर्षाची तर दुसरी 15 वर्षाच्या दोन मुली होत्या. त्यात ह्या महिलेचं वय देखील 45पेक्षा अधिक होतं. आर्थिक चणचण आणि गरीब परिस्थितीमुळे आई-वडिलांना या मुलाला सांभाळणे कठिण होते हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होते, असे देखील पूनम मिरगणे सांगतात. 


दरम्यान, बाळाला जास्त दिवस रुग्णालयात ठेवता येत नसल्यानं ह्या मुलाचा ताबा जुहू पोलिसांनी घेतला आणि त्याचं नामकरण करतत्याला नाव दिलं शौर्य. शौर्यनं कठोर अशा समजल्या जाणाऱ्या पोलिसांना देखील लळा लावला होता. शौर्यची संपूर्ण देखभाल आणि कोडकौतुक पोलिसच करत होते. अशातच मुलाचा ताबा आपल्याकडे ठेवता येत नसल्यानं त्याला सेंट कॅथरीन होममध्ये दाखल करण्यात आले. शौर्यला कॅथरीन होममध्ये जरी शिफ्ट करण्यात आले असले तरी त्याची माहिती पोलिस नियमित घेत असतात. आठ महिन्याच्या ह्या प्रवासात आई-वडिलांचा अजूनही पत्ता नाही त्यामुळे ह्या गोंडस मुलाला आता दत्तक घेण्यासाठी अनेक जण रांगेत आहेत. शौर्यला जन्म पोलिसांनी दिला नसला तरी नाव दिलं आहे आणि आयुष्यात हीच त्याची ओळख देखील असेल.