Mumbai Student Protest:  मुंबईतील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी विद्यार्थ्यांचे सुरू असलेले आंदोलन आठ तासानंतर मागे घेण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन तात्पुरत्या स्वरुपात मागे घेतले असल्याची घोषणा केली आहे. बुधवारी रात्री झाडावरून पडलेल्या विद्यार्थ्याला वेळेवर उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. 


मुंबईतील वरळी येथील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात BAMS तृतीय वर्षात शिकणाऱ्या धाराशिव येथील दयानंद काळे वय 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. दयानंद हा बुधवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास आंबे काढायला झाडावर गेला होता. त्यावेळी झाडावरून खाली पडून त्याचा मृत्यू झाला. विद्यार्थ्यांचा हा झालेला मृत्यू कॉलेज प्रशासनाच्या आणि रुग्णालयाचे निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला. त्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून वरळी येथील पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयातील ओपीडी विद्यार्थ्यांनी बंद ठेवत या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू केलं. आठ तासानंतर कॉलेज प्रशासनाकडून मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या मागण्या संदर्भातील आश्वासनानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले आहे.


विद्यार्थ्यांचा आरोप काय?


पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयात दयानंद काळे हा विद्यार्थी बुधवारी रात्री 10.30 च्या दरम्यान कॉलेज परिसरात असलेल्या आंब्याच्या झाडावर आंबे काढण्यासाठी चढला होता. मात्र, त्याचा तोल जाऊन तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज होती. मात्र, कॉलेज प्रशासन आणि रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले नाही. त्यासोबतच या सगळ्या प्रकरणात तत्परता दाखवली गेली नाही. आणि त्यामुळे या विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटल आहे. विद्यार्थ्यांच्या आरोपाला काही विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा देत पुकारलेल्या आंदोलनात सहभागी झाले व सकाळपासून ओपीडी सेवा पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.


याबाबत, विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने कॉलेजच्या अधिष्ठाता संपदा संत आणि महाराष्ट्र आयुष संचालनालयाचे संचालक राजेश्वर रेड्डी यांच्या सोबत चर्चा केली. चर्चेनंतर मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत प्राप्त करून देण्याचा त्यासोबतच या सगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी करण्यासाठी समिती नेमून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन कॉलेज प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेतले आहे.