मुंबई : 15 ऑगस्टनंतर प्लॅस्टिक पिशवी वापरल्यास मुंबईत पाच हजारांचा दंड केला जाणार आहे. यामध्ये प्लॅस्टिक पिशवी विक्रेत्या दुकानदारांसह फेरीवाले आणि ग्राहकांवरही कारवाई केली जाईल. यासाठी पालिकेचे तीन अधिकारी, एक पोलीस आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्याचे स्वतंत्र पथक नेमले जाणार आहे. मुंबईत अनेकदा प्लास्टिकच्या कचऱ्यामुळं पाणी तुंबल्याचे निदर्शनास आलंय.  मुंबईत अतिकृष्टी झाल्यास अनेकवेळा सखल भागांत पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. प्लॅस्टिक कचरा जलवाहिन्या, मॅनहोलमध्ये अडकल्यामुळेच अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याचं निदर्शनास येते. त्यामुळं प्लॅस्टिककिरोधी कारवाई तीव्र करण्यात आलीय. 


प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई


26 जुलै 2005 मध्ये मुंबईत आलेल्या महापुरास 50 मायक्रॉनच्या प्लास्टिक पिशव्या कारणीभूत ठरल्या. त्यानंतर 2018 मध्ये 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्याच्या वापरावर बंदी घालण्यात आली. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा बडगा उगारण्यास सुरुवात केली. मात्र 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि प्रतिबंधित प्लास्टिक कारवाई थंडावली. आता मात्र प्रतिबंधित प्लास्टिक विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.


प्लास्टिक कचरा नाले, गटारांमध्ये अडकून राहिल्याने पूर परिस्थती


दरम्यान प्लास्टिकपासून निर्माण होणाऱ्या अविघटनशील कचऱ्याचा सागरी व वन्यजीव तसेच मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. प्लास्टिक कचरा नाले, गटारांमध्ये अडकून राहिल्याने पूर परिस्थती निर्माण होते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकारने प्लास्टिक वापराबाबत निर्बंध कडक केले. पर्यावरणाचा समतोल राखला जावा आणि प्रदूषण कमी व्हावे या दृष्टिकोनातून 2018 साली राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा निर्णय महाराष्ट्रात घेतला. त्यानंतर केंद्र सरकारने सुद्धा प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतल्यानंतर एकदाच वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर जुलैमध्ये राज्य सरकारने बंदी घातली होती.


सिंगल यूज प्लास्टिक'च्या 'या' गोष्टींवर बंदी 


प्लास्टिक कॅरी बॅग, पॉलिथीन (75 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या) , फुग्यांसाठी वापरली जाणारी प्लास्टिक स्टिक, कँडी स्टिक,  थर्माकोल (पॉलिस्ट्रिन), प्लास्टिकच्या प्लेट, प्लास्टिकचे कप, प्लास्टिकचे ग्लास, चमचे, चाकू, स्ट्रॉ, ट्रे, मिठाईच्या डब्ब्यांना लावण्यात येणारा प्लास्टिकचा कागद, इन्विटेशन कार्ड ,सिगरेटचं पॅकेट,100 मायक्रॉनहून कमी प्लास्टिक किंवा पीवीसी बँनर ,स्टिरर (साखर किंवा इतर धान्य मिळणाऱ्या गोष्टी)


 दैनंदिन कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण लक्षणीय आहे. यातील कचऱ्याचे विघटन व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही. कचरा डेपो, समुद्रामध्ये हा कचरा फेकला जातो. याची पुनर्प्रक्रिया शक्य नसल्याने रात्रीच्या वेळी जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळेच हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे