मुंबई : रुग्णालयात गेल्यावर आजारातून बरं होण्याची तुमची अपेक्षा असते. मात्र मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातून घरी परत येताना कदाचित तुम्ही नवा आजार सोबत घेऊन आला असाल. कांदिवलीतल्या शताब्दी रुग्णालयात उंदरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे.


कांदिवलीतल्या मुंबई महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयातील रुग्ण उंदरांमुळे वैतागले आहेत. प्रमिला नेरुळकर आणि शांताबेन जाधव या महिला गेल्या आठवड्याभरापासून शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. रुग्णालयात रात्री उंदरांनी प्रमिला नेरुळकर यांच्या डोळ्याला चावा घेतला तर शांताबेन जाधव यांच्या पायाचा तळवा कुडतडला.

अशा परिस्थितीत रुग्णालयात उपचार घ्यावा की उंदरांपासून स्वतःचा बचाव करावा असा प्रश्न रात्रीच्या वेळी रुग्ण आणि नातेवाईकांना सतावतो.

मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागात लाखो रुपये खर्च करण्यात येतात. तरीही महानगरपालिका रुग्णालयात सोयी सुविधांची वानवाच. त्यामुळे उपचार राहिला बाजूला, नव्या आजाराला निमंत्रण देणाऱ्या या रुग्णालयावर कारवाईची मागणी होत आहे.