मुंबई : सिंचन घोटाळ्याचा डाग लागलेले राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्यासोबत मंचावर बसण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळलं आहे. तटकरेंवरील पुस्तकाच्या प्रकाशनाला फडणवीसांनी हजेरी लावली नाही.
सुनील तटकरे यांच्या राजकीय कारकीर्दीला आज 30 वर्षे पूर्ण झाली. याचं औचित्य साधून मुंबईतल्या रविंद्र नाट्य मंदिरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. मात्र विरोधात असताना सिंचन घोटाळ्यांवरुन ज्यांच्या अटकेची मागणी फडणवीस यांनी केली होती, तेच आता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावणं टाळलं असलं तरी भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील आणि गिरीष बापट यांनी मात्र या कार्यक्रमाला उपस्थिती लावली आहे. या कार्यक्रमाला नारायण राणे यांचीही उपस्थिती असल्यानं त्यांच्यासोबत मंचावर बसण्याचं शिवसेनेच्या संजय राऊतांनीही टाळलं आहे.
दरम्यान, हा कार्यक्रम सुरु होण्याआधी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रविंद्र नाट्य मंदिराबाहेर निदर्शनं केली आणि कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा आग्रह केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारत ताब्यात घेतलं. सिंचन घोटाळ्यात अडकलेल्या तटकरेंच्या कार्यक्रमाला सरकारचे प्रतिनिधी कसे उपस्थित राहतात, असा सवाल अंजली दमानिया यांनी केला.
तटकरेंच्या पुस्तक प्रकाशनाला हजेरी लावणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Oct 2017 07:10 PM (IST)
विरोधात असताना सिंचन घोटाळ्यांवरुन ज्यांच्या अटकेची मागणी फडणवीस यांनी केली होती, तेच आता या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? अशी चर्चा सुरु असतानाच मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -