मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणाऱ्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांच्या अडचणीत वाढ झाली आहे. परमबीर सिंह देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी त्यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याच्या हालचाली सुरु आहेत. राज्याच्या सीआयडी विभागाने केंद्रीय गृहमंत्रालयाला तसं पत्र पाठवलं आहे. 


परमबीर सिंह नेमकं कुठं आहेत हे अद्याप कुणालाच माहिती नाही. त्यामुळे ते देश सोडून जाऊ नयेत यासाठी पोलिसांच्या वतीनं रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. एकदा का त्यांच्या विरोधात रेड कॉर्नल नोटिस जारी केली तर त्यांना देश सोडून जाणं कठीण होईल. तसे निर्देश देशातील सर्व विमानतळांना देण्यात येतात. 


दरम्यान, राज्य सरकारने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचा पगार थांबवला आहे. परमबीर सिंह यांना फरार घोषित करण्याचीही राज्य सरकारकडून तयारी सुरु झाली आहे. 


परमबीर सिंहांच्या विरोधात ठाण्यात गुन्हा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरुद्ध आज ठाणे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. बिपिन अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अटक करण्यात आलेला छोटा शकीलचा गुंड रियाझ भाटी हेही आरोपी आहेत. अग्रवाल यांच्या मते वाझे आणि इतर आरोपी मिळून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळायचे आणि पैसे न दिल्यास त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवली जात होती.


अनिल देशमुखांवर परमबीर सिंग यांचे आरोप काय?
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना बार मालक आणि इतरांकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. शिवाय सीबीआय आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.


बार मालक दर महिन्याला अडीच लाख रुपये देत होते असा आरोप बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने केला होता. सेवेत असताना सचिन वाझे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होता. मार्चमध्ये सचिन वाझेला अटक केली होती.


महत्त्वाच्या बातम्या :