Warrant Against Param Bir Singh: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याच्याविरुद्ध आज ठाणे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पोलिसांनी बुधवारी न्यायालयात अर्ज दाखल केला होता की सिंग यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात यावे कारण ते त्यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या वसुली प्रकरणात फरार आहेत आणि समन्सवर चौकशीसाठीही हजर होत नाही.


बिपिन अग्रवाल नावाच्या व्यावसायिकाने मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणात परमबीर सिंग यांच्यासह सचिन वाझे आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरणी अटक करण्यात आलेला छोटा शकीलचा गुंड रियाझ भाटी हेही आरोपी आहेत. अग्रवाल यांच्या मते वाझे आणि इतर आरोपी मिळून मुंबईतील बार आणि रेस्टॉरंटमधून पैसे उकळायचे आणि पैसे न दिल्यास त्यांच्यावर कारवाईची भीती दाखवली जात होती.


विशेष म्हणजे, मुंबई पोलीस आयुक्तपदावरून हटवल्यानंतर काही दिवसांनी परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्षाच्या सुरुवातीला लिहिलेल्या पत्रात दावा केला होता की देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि बारमधून पैसे गोळा करण्यास सांगत होते. 


नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परमबीर सिंग यांच्यावर निशाणा साधला होता आणि म्हटले होते की, राज्यात तक्रारदार बेपत्ता झाल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे.


माजी गृहमंत्र्यावर परमबीर सिंग यांचे आरोप काय?
अनिल देशमुख यांनी सचिन वाझे आणि आणखी दोन पोलीस अधिकाऱ्यांना बार मालक आणि इतरांकडून 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, राज्यपालांना पत्र लिहिलं होतं. यानंतर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. शिवाय सीबीआय आता या प्रकरणाची चौकशी करत आहे.


बार मालक दर महिन्याला अडीच लाख रुपये देत होते असा आरोप बडतर्फ सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझेने केला होता. सेवेत असताना सचिन वाझे तत्कालीन मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना रिपोर्ट करत होता. मार्चमध्ये सचिन वाझेला अटक केली होती.