मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी बुधवारी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात उद्योगपती राज कुंद्रासह अन्य दोघांवर सुमारे दीड हजार पानांचं पुरवणी आरोपपत्र दाखल केलं. यात पीडित मुलींचा लैंगिक छळ करणे, त्यांची फसवणूक करणं तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलमांनुसार पोलिसांनी आरोप लावले आहेत. यात प्रामुख्यानं सध्या राज कुंद्रासह अटकेत असलेला त्याचा कर्मचारी रायन थॉर्पवर पोलिसांनी हे आरोप दाखल केले आहेत.


यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये मुंबई पोलिसांनी याप्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल केलं होतं. राज कुंद्राच्या लॅपटॉपमध्ये सापडलेल्या 60 हून अधिक अश्लील व्हिडीओ क्लिप पोलिसांनी सोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील अनेक आरोप पोलिसांनी पुरवणी आरोपपत्रात ठेवले आहेत. जुलै महिन्यात याप्रकरणी अटक केल्यापासून राज कुंद्रा आणि थॉर्प जेलमध्येच आहेत. मात्र आता आरोपपत्र दाखल झाल्यानं त्यांच्या जामीनाची आशा निर्माण झाली आहे.


काय आहे प्रकरण? 


राज कुंद्राविरोधात सायबर गुन्हे शाखेनं गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात पोर्नोग्राफीच्या पहिल्या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये 'आर्मप्राईम मीडिया प्राईव्हेट लिमिटेड' नामक कंपनीकडून आपल्याशी संपर्क साधला गेला होता. त्या अॅपमार्फत नवोदित प्रतिभावंत कलाकारांना त्यांचा अभिनय डिजिटल माध्यमातून दाखवण्याची संधी देण्यात येणार होती. त्यांची संकल्पना आवडली आणि व्यवसायिक म्हणून आपण त्यात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतल्याचं कुंद्रानं आपल्या याचिकेत म्हटलेलं आहे. त्यानुसार फेब्रुवारी ते डिसेंबर 2019 दरम्यान संबंधित कंपनीशी करार करण्यात आला होता. त्यादरम्यान आपला चित्रपट निर्मितीमध्ये जराही सक्रिय सहभाग नव्हता. तसेच हॉटशॉट्स अॅपमधील पोर्नोग्राफीशीही आपला काहीही संबंध नसून आपल्यावरील आरोप हे खोटे असून आपल्याला यात गोवण्यात आल्याचा दावाही राज कुंद्रानं कोर्टापुढे केला आहे.


संबंधित बातम्या :