Measles in Mumbai: कोरोनाचं संकट (Coronavirus) पुन्हा घोंगावत असतानाच मुंबईत (Mumbai News) आधीपासूनच प्रादुर्भाव असलेली गोवरची साथ (Measles Updates) अद्याप आटोक्यात आलेली नाही. मुंबईतील गोवरचा प्रादुर्भाव अद्याप थांबण्याचं नाव घेईना. शुक्रवारी (23 डिसेंबर) पुन्हा गोवरचे सहा नवे रुग्ण आढळून आले. त्यामुळे गोवरची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 512 झाली आहे. गोवरच्या प्रादुर्भावाच्या सुरुवातीला 9 बालकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुंबईत गोवरमुळे अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. मुंबई महापालिकेच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, शहरात पाच संशयित मृत्यूही झाले आहेत, पण हे मृत्यू गोवरामुळे झाले की अन्य काही कारणांमुळे हे अद्याप निश्चित झालेले नाही.
मुंबई महापालिकेकडून (BMC) देण्यात आलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 27 मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तर, 25 मुलांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून सोडण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, "गोवर उपचारासाठी राखून करण्यात आलेल्या 335 खाटांपैकी 116 खाटांवर रुग्ण दाखल आहेत, तर 219 खाटा रिकाम्या आहे. 20 व्हेंटिलेटर खाटांपैकी फक्त चार रुग्णांना याची गरज आहे. बाकीच्या जागा रिक्त आहेत."
गोवर लसीकरण वेगानं सुरू
9 महिने ते 5 वर्ष वयोगटातील 2,60,739 मुलांपैकी 73,609 बालकांना गोवर-रुबेला विशेष लसीचा अतिरिक्त डोस 78 आरोग्य केंद्रांवर देण्यात आला असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. आणि 6 ते 9 महिने वयोगटातील 5,293 मुलांपैकी, जिथे 9 महिन्यांखालील गोवर रुग्णांची संख्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त आहेत, त्या 1,849 बालकांना एमआर लसीचा 'शून्य डोस' देण्यात आला.
महाराष्ट्रात गोवरची स्थिती
राज्याच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, 22 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात गोवर रुग्णांची संख्या 1158 वर पोहोचली आहे, तर गोवरमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 20 आहे. विभागातर्फे 15 डिसेंबरपासून 28 दिवसांच्या अंतरानं 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना अतिरिक्त पूरक आहार देण्याची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्यभरात विशेष मोहिमेअंतर्गत 12,004 अतिरिक्त लसीकरण सत्रांद्वारे 48,934 प्रथम डोस आणि एमआरचे 47,721 डोस देण्यात आले आहेत, असं आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.