PM Modi meet Rudransh Shrikant Shinde: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे अनेकदा लहान मुलांमध्ये रमलेले दिसून येतात. शैक्षणिक कार्यक्रम असो वा कुठला संवाद पंतप्रधान मुलांशी संवाद साधण्यावर भर देतात. आज देखील पंतप्रधानांनी एका खास पाहुण्यासोबत काही वेळ घालवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा नातू आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांचा लहान मुलगा रुद्रांशसोबतचे पंतप्रधानांचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. 


श्रीकांत शिंदे आज त्यांची पत्नी आणि मुलगा रुद्रांशसह पंतप्रधानांना भेटायला गेले होते. यावेळी पंतप्रधानांनी रुद्रांशसोबत काही वेळ गप्पा मारल्या शिवाय पंतप्रधानांनी त्याला टाळीही दिली. 


याबाबत श्रीकांत शिंदे यांनी एक ट्वीट करत आपला आनंद व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जीवनाचा खरा आनंद अनुभवायचा असेल तर मुलांमध्ये मिसळावे,त्यांच्या भावनांशी एकरूप व्हावे” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी म्हणतात. जेव्हाजेव्हा बालकांच्या सहवासाची संधी मिळते तेव्हा ते स्वतःलाही विसरतात.  आजही असंच झालं, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. 






श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं की,  पंतप्रधान मोदी यांची आज  सहकुटुंब सदिच्छा भेट घेतली. यावेळी माझा मुलगा चि.रुद्रांश सोबत मोदीजींनी अत्यंत जिव्हाळ्याने संवाद साधत त्याला आशीर्वाद दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दिलेला खाऊचा रुद्रांशने देखील हास्यमुखाने आनंदाने स्विकार केला, असंही खासदार शिंदेंनी म्हटलं आहे. 


या भेटीदरम्यान प्रधानमंत्री मोदी यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांची देखील विचारपूस करित कुटुंबीयांची आस्थेने चौकशी केली. यासमयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन सत्कार केला, असं श्रीकांत शिंदेंनी सांगितलं. 






दरम्यान पंतप्रधान मोदी आणि शिंदे फॅमिलीच्या भेटीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. यात पंतप्रधान मोदी छोट्या रुद्रांशशी संवाद साधताना दिसत आहेत. याआधी खासदार धैर्यशील माने यांची कन्या आदिश्री देशील पंतप्रधानांना भेटली होती.  त्यावेळी तिनं संसदेत अनेक दिग्गज नेत्यांशी भेटी घेत संवाद साधला होता.