मुंबई : मुंबई उत्तर पश्चिमचे (Mumbai North West Lok Sabha)  नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर (Ravindra Waikar)  यांच्या मेहुण्याविरोधात तक्रार करणारे अपक्ष उमेदवार भरत शाह (Bharat Shah)  यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.  शाह यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धमकी देणारा व्यक्तीचे विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीये. खासदार रवींद्र वायकर यांचा मेहुणा मतमोजणीच्या दिवशी नेस्को सेंटरमध्ये मोबाईलचा वापर करत असल्याचा तक्रार भारत शाह यांनी केली होती.


उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीवेळी मोठा गैरप्रकार झाला असल्याचा आरोप हिंदू समाज पक्षाचे उमेदवार भरत शाह यांनी केला होता. मत मोजणीवेळी मोबाइल नेण्यास परवानगी नसताना वायकर यांचे मेव्हणे व मुलगी सतत फोनवर संपर्कात होते. तक्रारीत पोलिसांनी वायकर यांच्या मुलीचं नावही घेतलेलं नसून पोलिस कुणाच्या दबावात काम करत आहेत असा सवाल शाह यांनी उपस्थित केला  होता.   


बाहेरून आमच्यावर दबाव : भरत शाह


उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघात  दिलेली तक्रार न घेता तिसऱ्याच व्यक्तीची तक्रार नोंदवण्यात आली आहे.  त्यात आम्ही फक्त साक्षीदार आहोत हा काय प्रकार चाललायं. हे वेळीच थांबायला हवं, आता तर बाहेरून आमच्यावर दबाव टाकत आहे, असे देखील भरत शाह म्हणाले होते . आता त्यानंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.


काय आहे प्रकरण?


लोकसभा निवडणुकीत केवळ 48 मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमध्ये (EVM) घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला आहे. तसेच, अमोल कीर्तीकर (Amol Kirtikar) यांच्याकडून यासंदर्भात अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी या प्रकरणात रवींद्र वायकर (Ravindra Waikar) यांच्या मेव्हण्याची एंट्री झाल्याने आणखी गोंधळ निर्माण झाला आहे. ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यामुळे, अमोल कीर्तीकर विरुद्ध रवींद्र वायकर यांच्यातील लढत पुन्हा एकदा चर्चेत आली. त्यावर, निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिलं आहे. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नसल्याचं स्पष्ट केले होते. 


हे ही वाचा :


EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा