Mumbai News : मुंबईतील (Mumbai) अनेक किल्ल्यांपैकी वांद्रे किल्ला (Bandra Fort) हा देखील प्रसिद्ध आहे. या ठिकाणी अनेक लोक किल्ला पाहण्याकरता येतात. मात्र या परिसरात प्रेमी जोडप्यांच्या वावर अधिक आहे. प्रेमी जोडप्यांकडून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अश्लील चाळे केले जातात त्यामुळे किल्ल्याचे पावित्र्य धोक्यात आहे. त्यामुळे वांद्रे किल्ल्यावर अश्लील वर्तणूक कधी बंद होणार असा सवाल उपस्थित करत, मुंबईतील सह्याद्री प्रतिष्ठानने राज्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांची भेट घेत कारवाई करण्याची मागणी केली आहे.


सह्याद्री प्रतिष्ठान मुंबई विभागातर्फे वांद्रे किल्ला येथील प्रेमी जोडप्यांच्या अश्लील वर्तणुकीस आळा बसवता यावा आणि किल्ल्यांचं पावित्र्य जपता यावं यासाठी महाराष्ट्र राज्याचे पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा यांची भेट घेतली. यावेळी स्थानिक आमदार आशिष शेलार तसेच सर्व स्थानिक प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते.


वांद्रे येथील शिवकालीन किल्ला पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. आजही किल्ल्यावर अनेक जोडपे अश्लील चाळे करताना निदर्शनास येत आहेत तसेच व्यसनांचा अवलंब करण्यासाठीही किल्ल्याचा वापर होत आहेत. या सर्व गोष्टींमुळे त्या स्थळाचे पावित्र्य नष्ट तर होत आहेच परंतु सामान्य पर्यटकांनाही तेथे एकटे किंवा लहान मुले आणि कुटुंबासोबत वावरणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित वातावरणासाठी उपाययोजना करा , अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे.


मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या समस्येबद्दल सविस्तर जाणून घेतली. मंत्री आणि आमदारांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला किल्ले आणि परिसरात कायदा व सुव्यवस्था सुधारण्याचे आणि घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्याचे निर्देश दिले आहेत.


वांद्रे किल्ल्याबद्दल...
वांद्रे किल्ला हा मुंबईतील पोर्तुगीज किल्ल्यांपैकी एक आ. हा किल्ला हॉटेल ताजला लागून आहे. सध्या आपण फक्त किल्ल्याचा पाया पाहू शकोत. किल्ल्यावर एकाच वेळी अरबी समुद्र, माहीम नदी आणि वांद्रे वरळी सीलिंकचे नयनरम्य दृश्य दिसते. पोर्तुगीजांनी माहीमच्या समुद्रात पाळत ठेवण्यासाठी उत्तरेकडील साष्टी (साल्सेट) बेटावर सन 1640 मध्ये त्याची उभारणी केली. सन 1774 मध्ये हा किल्ला ब्रिटिशांकडे आला. किल्ल्याजवळ प्रार्थनास्थळ असावे म्हणून माऊंट मेरी चर्चची उभारणी 1640 मध्ये झाली. हा किल्ला आता भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या मालकीचा आहे. वांद्रे हा साष्टी बेटाचा नैऋत्येकडील भाग होता. कालांतराने अनेक छोटी गावे तिथे वसली. त्यापैकी रानवर, शेर्ली, राजन, पाली, चुईम, चिंबई आदी गावे आजही अस्तित्वात आहेत.